पणजी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्रानंतर अडीच महिन्यांनी आता गोव्यामध्ये राजकीय भूकंप झाला आहे. काँग्रेसचे तब्बल ८ आमदार फुटले आहेत. हे सर्व आमदार भाजपमध्ये दाखल झाले आहेत. गोव्यात काँग्रेसचे एकूण ११ आमदार निवडून आले आहेत. आता त्यातील तब्बल ८ फुटल्याने काँग्रेसला मोठेच खिंडार पडले आहे. या फुटीर आमदारांमध्ये विरोधी पक्षनेते मायकेल लोबो, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, गोवा निवडणुकीत पक्षबद्दल हा निवडणुकीत महत्वाचा मुद्दा होता. काँग्रेस आमदारांनी एकनिष्ठतेची जाहीर शपथही घेतली होती. आणि आता सहा महिन्यातच त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. दरम्यान, गोव्यात भाजपचे ऑपरेशन लोटस यशस्वी झाले आहे.
गोवा काँग्रेस विधिमंडळ गटात मोठी फूट पडली आहे. अकरापैकी आठ आमदार विधिमंडळ गट भाजपात विलीन झाले आहे. भाजप श्रेष्ठींकडून या विलीनीकरणाला हिरवा कंदील मिळाला आहे. दोन महिन्यांपूर्वीच गोव्यात ऑपरेशन लोटस राबवण्यात भाजपाला अपयश आले होते. मात्र आज भाजपाची राजकीय खेळी प्रभावी ठरताना दिसतेय. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या सुरू आहे. काँग्रेस पक्षाला बळकटी देण्याचा यात उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याच यात्रेदरम्यान, गोवा काँग्रेसचे ८ आमदार फुटल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
काँग्रेसचे मायकल लोबो (माजी विरोधी पक्षनेते), दिगंबर कामत, दिलायला लोबो, राजेश फळदेसाई, रुदाल्फ फर्नांडिस, अलेक्स सिक्वेरा, केदार नाईक, संकल्प आमोणकर या आठ आमदारांनी भाजपात प्रवेश केला आहे. काँग्रेसचे आमदार विधान भवनात येण्यास सुरुवात झाली आहे. या संदर्भात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि गोवा भाजपाचे अध्यक्ष सदानंद तनावडे यांच्या उपस्थितीत या आमदारांनी प्रवेश केला आहे.
काँग्रेसच्या ११ पैकी ८ आमदारांचा भाजपात प्रवेश झाल्याने त्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होणार नाही आणि ते भाजपात विलीन होतील, असे म्हटले जात आहे. यापैकी काही आमदारांना मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गोवा विधानसभेत एकूण ४० सदस्यसंख्या आहे. या वर्षी फेब्रुवारी महिन्यातच गोवा विधानसभा निवडणुका झाल्या. यात भाजपा आणि मित्रपक्ष यांचे २५ आमदार आहेत. तर काँग्रेसचे ११ आमदार आहेत. मात्र आता काँग्रेसच्या ११ पैकी ८ आमदारांचा भाजपात प्रवेश झाल्याने गोव्यात ऑपरेशन लोटस यशस्वी झाले आहे.
जुलै महिन्यात देखील भाजपने काँग्रेसच्या आमदारांना गळाला लावण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी ११ पैकी ५ आमदारांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगली होती. मात्र काँग्रेसने वेळीच सतर्कता दाखवत ही गळती थांबवली होती. त्यावेळी काँग्रेसचे आमदार दिगंबर कामत, मायकल लोबो, राजेश फलदेसाई, केदार नाईक आणि दलीला लोबो हे बंडखोरी करणार असल्याची चर्चा होती. काँग्रेसने मायकल लोबो यांना पक्षविरोधी कारवायांचा आरोप करत विरोधी पक्षनेते पदावरून काढून टाकले होते. आता गोवा काँग्रेसमध्ये एवढी फूट पडल्याने पुढे काय होणार याची चर्चा सुरू आहे.
Goa Political Crisis Congress 8 MLA Joins BJP