इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कथित सेक्स स्कँडलच्या चर्चेमुळे गोव्याचे पंचायत मंत्रह माविन गुदीन्हो अडचणीत आले आहे. या प्रकरणी गुदिन्हो तसेच पीडित महिला अशा दोन्ही बाजूने परस्परविरोधी तक्रारी पोलिसांकडे करण्यात आल्या आहेत. गुदीन्हो यांच्यावरील आरोपामुळे विरोधकांकडून गोवा येथील भाजप सरकारवर टीकेची झोड उडत आहे.
राज्यभर चर्चा सुरू असलेल्या कथित सेक्स स्कँडलप्रकरणी पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांचे खासगी सचिव निहाल केणी यांनी वास्को पोलिस स्थानकात तक्रार दिली. तर मुरगाव तालुक्यातील राजकीय क्षेत्राशी संबंधित एका महिलेने सायबर क्राइम पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली आहे. मंत्री दिन्हो यांच्यावतीने दाखल तक्रारीनुसार कोणीतरी खोटी पोस्ट व्हायरल करून मंत्र्यांची विनाकारण बदनामी केली आहे. संबंधितांविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार बदनामी करण्यासाठी सोशल मीडियात इंग्रजी माध्यमातील एका वृत्ताखाली माझा फोटो जोडून तो व्हायरल करण्यात येत आहे. ‘पॉलिटिशियन इन्व्हॉल्व्ड इन सेक्स स्कँडल/ किडनॅपिंग?’ या शिर्षकाखाली संबंधित महिलेचा फोटो चिकटवून तो व्हायरल केला जात असल्याचे महिलेने पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. अशी बदनामी करणाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. त्या तक्रारीची प्रत वास्को पोलिस स्थानकातही दिली असून महिलेच्या तक्रारीबाबत पोलिसांनी चौकशी सुरू केली असल्याचे सांगण्यात आले.
अजून एक मंत्री गोत्यात येण्याची शक्यता!
गुदीन्हो यांच्यावर आरोपाचे सत्र सुरू असतानाच काँग्रेसने अजून एका मंत्र्याचा समावेश असल्याचा स्फोट केला आहे. काँग्रेसचे नेते गिरीश चोडणकर यांनी एक वृत्त ट्वीट करत सेक्स स्कँडलमध्ये सामिल कोण तो दुसरा मंत्री, असा प्रश्न उपस्थित केला आहे. चोडणकर यांनी त्या नाजूक प्रकरणाची माहिती दिल्ली दरबारी पोहोचवल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
Goa Minister Sex Scandal Women Complaint Police