विशेष प्रतिनिधी, मुंबई/पणजी
कोरोना साथीच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गोव्याच्या एंटरटेनमेंट सोसायटीने फिल्म आणि टीव्ही शोच्या शटिंगसाठी सर्व परवानग्या रद्द केल्या आहेत. गोवा सरकारच्या आदेशामुळे घेतलेल्या या निर्णयाचा मराठी टीव्ही मालिकांना फटका बसला आहे.
एन्टरटेन्मेंट सोसायटी ऑफ गोवा ही गोवा सरकारची नोडल एजन्सी असून ती राज्यात शुटींग संबंधितच्या बाबींची देखरेख करते. महाराष्ट्र आणि चेन्नईच्या निर्मात्यांनी कोरोना साथीच्या वाढत्या प्रकरणामुळे आपले चित्रपट आणि टीव्ही मालिकांचे शुटिंग गोव्यात सुरू केले होते. तथापि, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता गोवा सरकारच्या एन्टरटेन्मेंट सोसायटीने ही परवानगी रद्द केली आहे, अशी माहिती उपाध्यक्ष सुभाष फलदेसाई यांनी दिली आहे.
देसाई म्हणाले की, गोवा राज्यात कोरोनाची साथ नियंत्रणात येईपर्यंत आम्ही सर्व शुटींगच्या परवानग्या रद्द केल्या आहेत. तसेच आम्ही आता कोणत्याही सार्वजनिक किंवा खाजगी ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या शुटींगला परवानगी देणार नाही. कोरोना रोखण्यासाठी सरकार काटेकोरपणे नियमांचे पालन करणार आहे. तसेच राज्यात कलम १४४ लागू केल्यामुळे ५ पेक्षा अधिक व्यक्तींना एका ठिकाणी एकत्र येण्यास मज्जाव आहे. त्यामुळे शुटींग शक्य नाही. गोव्यातील कोरोनास्थिती नियंत्रणात आल्यानंतर पुन्हा एकदा आढावा घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, गोव्यात गेल्या २४ तासात सुमारे साडेतीन हजार नवे कोरोना रुग्ण आढळले. वास्तविक मुंबईत शुटींग बंद पडल्यामुळे अनेक निर्मात्यांनी आपले चित्रपट, मालिका आणि शोचे शुटींग गोव्यात हलवले होते. आता तिथेही लॉकडाऊन आणि कडक निर्बंधांमुळे हे शुटींग अडचणीत आले आहे. त्यामुळे आता मराठी मालिका उद्योग हा आणखी अन्य राज्याची वाट धरणार की अन्य काही निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.