पणजी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू आहे. गोव्यात १४ फेब्रुवारीला मतदान होणार असल्याने आता प्रचारही रंगात आला आहे. यंदाची निवडणूक आणखी एका कारणासाठी रंजक होत आहे. कारण यावेळी पाच दाम्पत्य रणांगणात उतरली आहेत. हे सर्व दाम्पत्य निवडून आले तर ४० सदस्यीय गोवा सभागृहाच्या एकूण संख्याबळाच्या ते एक चतुर्थांश असतील.
भाजपने दोन जोडप्यांना उमेदवारी दिली आहे. तसेच, अशा एका नेत्याला तिकीट दिले आहे ज्याची पत्नी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे. काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसने प्रत्येकी एका जोडप्याला तिकीट दिले आहे. भाजप नेते विश्वजित राणे हे वालपोई विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत, तर त्यांच्या पत्नी दिव्या यांनी पोरीम मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर उमेदवारी दाखल केली आहे. सध्या पोरिम प्रदेशाचे प्रतिनिधित्व दिव्याचे सासरे व
काँग्रेसचे नेते प्रतापसिंह राणे हे करत आहेत.
भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा मुलगा उत्पल हे पणजीतून अपक्ष उमेदवारी करीत आहेत. याच विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने प्रतापसिंह राणे यांना तिकीट दिले आहे. भाजपने पणजी विधानसभा मतदारसंघातून अतानासिओ मोन्सेरात यांना तर त्यांची पत्नी जेनिफर यांना तळेगाव मतदारसंघातून तिकीट दिले आहे.
उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर आणि त्यांच्या पत्नी सावित्री कवळेकर हेही रिंगणात आहेत. चंद्रकांत यांना भाजपने क्वेपेम मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे, परंतु सावित्री यांना संगम विधानसभा मतदारसंघातून पक्षाने तिकीट नाकारले आहे. त्यामुळे सावित्री या संगममधूनच अपक्ष उमेदवारी करणार आहेत. काँग्रेसने मायकेल लोबो आणि त्यांच्या पत्नी डेलाला यांना अनुक्रमे कलंगुट आणि सिओलीम मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. तर तृणमूल काँग्रेसने अल्दोना मतदारसंघातून किरण कांदोळकर यांना तिकीट दिले आहे, तसेच त्यांच्या पत्नी कविता या थिविम मतदारसंघातून पक्षाची उमेदवार करीत आहेत.