नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गो फर्स्ट या विमानसेवा कंपनीबाबत आज मोठा निर्णय झाला आहे. एनसीएलटी (नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल) ने स्वैच्छिक दिवाळखोरी निराकरण प्रक्रिया सुरू करण्यासाठी GoFirst ची विनंती स्वीकारली आहे. NCLT ने CIRP (कॉर्पोरेट दिवाळखोरी रिझोल्यूशन प्रक्रिया) अंतर्गत कार्यवाही सुरू करण्यासाठी GoFirst ची विनंती स्वीकारली आहे. NCLT ने GoFirst ला त्यांच्या ऑपरेशनल आणि आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करत राहण्यास आणि कोणत्याही कर्मचार्याला कामावरून काढू नये असे बजावले आहे.
संचालक मंडळ निलंबित
एनसीएलटीने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, दिवाळखोरीच्या निराकरण प्रक्रियेसाठी आम्ही गो फर्स्ट एअरलाइन्सची याचिका स्वीकारतो. दिवाळखोरी घोषित करण्यासंबंधीच्या याचिकेवर सुनावणी करताना राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने (NCLT) कंपनीच्या संचालक मंडळाला निलंबित केले आहे. “आम्ही अभिलाष लाल यांची इंटरिम रिझोल्यूशन प्रोफेशनल (IRP) म्हणून नियुक्ती करतो.”, असे निकालात म्हटले आहे.
उड्डाणे रद्द
या निर्णयानुसार निलंबित संचालक मंडळ आयआरपीला सहकार्य करेल. निलंबित संचालकांना तत्काळ खर्चासाठी ५ कोटी रुपये जमा करण्यासही सांगण्यात आले आहे. दरम्यान, एअरलाइनकडून असे सांगण्यात आले आहे की ऑपरेशनल समस्यांमुळे १९ मे पर्यंत सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
एवढी आहे देणी
NCLT खंडपीठाने बुधवारी एअरलाइनच्या आर्थिक दायित्वांवर अंतरिम स्थगिती मागणाऱ्या अर्जावरही निर्णय घेतला. NCLT ने GoFirst ला वित्तीय संस्था, सावकारांकडून वसुली करण्यापासून संरक्षण दिले आहे आणि त्यावर सध्या बंदी घातली आहे. गो फर्स्टचे सुमारे ११, ४६३ कोटी रुपयांचे दायित्व आहे. वाडिया ग्रुप कंपनीने विमान इंजिनच्या पुरवठ्याशी संबंधित समस्यांचे कारण देत उड्डाणे चालवण्यास असमर्थ असल्याचे सांगितले होते.
विमानांची नोंदणी
दुसरीकडे, GoFirst च्या विमान भाड्याने देणाऱ्या कंपन्यांनी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला (DGCA) विमान कंपनीच्या विमानाची नोंदणी रद्द करण्याची विनंती केली आहे. आतापर्यंत ४५ विमानांची नोंदणी रद्द करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. २ मे रोजी जेव्हा GoFirst विमानांचे ऑपरेशन बंद करण्यात आले तेव्हा कंपनीच्या ताफ्यात ५५ विमाने होती.
https://twitter.com/GoFirstairways/status/1656178841189257216?s=20
Go First Airline Operation Service NCLT