नाशिक – नाशिकमध्ये प्रस्तावित असलेले ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोरोना संसर्गामुळे लांबणीवर टाकण्यात आले आहे. सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने राज्य सरकारने कोरोना निर्बंधांमध्ये शिथीलता आणली आहे. त्यामुळे साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबत पुन्हा हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात पालकमंत्री छगन भुजबळ यांना विचारले असता त्यांनी मोठे विधान केले आहे. भुजबळ म्हणाले की, पुढील महिन्यात दिवाळीनंतर म्हणजेच नोव्हेंबरच्या दुसऱ्या अथवा तिसऱ्या आठवड्यात नाशिकमध्ये साहित्य संमेलन घेण्याबाबत चाचपणी केली जाईल. अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. कोरोनाची परिस्थिती पाहून अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे.
नाशिक कोरोना आडावा बैठकीनंतर भुजबळ पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर त्यांचे मत व्यक्त केले. भुजबळ यांनी अनेक प्रश्नांना दिलेली उत्तरे अशी
– देवळाली मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे यांना शिवसेनेचे माजी आमदार योगेश घोलप यांनी इशारा दिला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असे चित्र आहे का, असे विचारले असता भुजबळ म्हणाले की, सर्व एकत्र काम करत आहेत. एका पक्षाच्या सरकारमध्येही अनेक झगडे होतात, हे तर तीन पक्षाचं सरकार आहे. त्यामुळे काही ना काही सुरूच राहणार. घोलपांच्या इशाऱ्याकडे फार लक्ष देऊ नका, असे त्यांनी स्पष्ट केले.
– राज्यातील अनेक महामार्गांवर खुप खड्डे असल्याबाबत भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली. राज्यमार्गावरील टोल बंद करण्यात आले आहेत. मात्र राष्ट्रीय महामार्गावरील टोल मात्र सुरुय. सर्व राज्यमार्ग हे राष्ट्रीय महामार्गाला देऊन टाकावे, असेही ते म्हणाले.
– अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर आयकरने धाडी टाकल्याबद्दल भुजबळ म्हणाले की, केंद्राविरोधात जास्त बोललं तर तोंड बंद करण्यासाठी केंद्राच्या वेगवेगळ्या यंत्रणांचा वापर करतात. सध्या जे काही सुरु आहे, ते अतिशय विचित्र आहे. लोकशाहीत अशा क्वचित घडल्या असतील, मात्र आता सर्रास सुरु आहे. नातेवाईकांच्या घरी जाऊन कारवाई करणं हा अतिरेक असल्याचे ते म्हणाले.
– नाशिकच्या कोरोना स्थितीबाबत ते म्हणाले की, मागील एक ते दोन महिन्यांपासून रूग्णसंख्या सरासरी 900 च्या घरात आहे. जिल्ह्यात 20 टक्के नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. 54 टक्के नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. निफाड आणि येवला तालुक्यात वाढणारी रुग्णसंख्या चिंताजनक आहे. रुग्णसंख्या वाढणाऱ्या तालुक्यात होम क्वारंटाईन बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. मार्केटमध्ये कोरोना नियमांचं पालन करणं गरजेचं, अन्यथा काही ठिकाणी मार्केट पुन्हा बंद करावे लागतील. नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे अजून रखडलेले आहेत. ड्रोनची मदत घेऊन पंचनामे करण्यावर विचार सुरू आहे. पीक विम्यासंदर्भात कृषीमंत्री दादा भुसे केंद्रीय मंत्र्यांना भेटून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत. गर्दी होणाऱ्या मंदिरं आणि मार्केटच्या ठिकाणी लसीकरण आणि टेस्टिंग सेंटर सुरू केले जाईल, असे त्यांनी सांगितले.