नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) ने भारतीय हवाई दलाच्या सुखोई-30 MK-I प्लॅटफॉर्मवरून लांब पल्ल्याचा ग्लाईड बॉम्ब (LRGB), गौरवची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी केली आहे. ही चाचणी ओदिशाच्या किनारपट्टीवर घेण्यात आली.
गौरव हा हवेतून सोडण्यात येणारा 1000 किलो श्रेणीतील ग्लाईड बॉम्ब असून लांब अंतरावरील लक्ष्याचा भेद करण्याची त्याची क्षमता आहे. हा ग्लाईड बॉम्ब टाकल्यानंतर आयएनएस आणि जीपीएस डेटा यांच्या एकत्रित वापराने अतिशय अचूक हायब्रिड दिशादर्शन प्रणालीद्वारे तो लक्ष्याच्या दिशेने प्रवास करू लागतो. गौरवची रचना आणि विकास स्वदेशी बनावटीने हैदराबादच्या रिसर्च सेंटर इमारतने(RCI) केला आहे.
या चाचणी उड्डाणादरम्यान ग्लाईड बॉम्बने दूर अंतरावर असलेल्या व्हीलर बेटावर उभारलेल्या लक्ष्याचा अतिशय अचूकतेने वेध घेतला. यावेळी या किनारपट्टीवर एकात्मिक चाचणी तळावर तैनात केलेल्या टेलिमेट्री आणि इलेक्ट्रो ऑप्टिकल ट्रॅकिंग प्रणालीने या चाचणी उड्डाणाचा संपूर्ण फ्लाईट डेटा ग्रहण केला. डीआरडीओच्या वरिष्ठ वैज्ञानिकांनी या उड्डाणावर देखरेख ठेवली. या चाचणी उड्डाणामध्ये अदानी डिफेन्स आणि भारत फोर्ज या विकास आणि उत्पादन भागीदार कंपन्या देखील सहभागी झाल्या.
या यशस्वी चाचणी उड्डाणाबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ, भारतीय हवाई दल आणि उद्योगाचे अभिनंदन केले. संरक्षण दलांच्या क्षमतेला बळकटी देण्यासाठी स्वदेशी बनावटीच्या संरक्षण तंत्रज्ञानाचा विकास करण्याच्या देशाच्या प्रयत्नांमध्ये ही चाचणी म्हणजे एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी सांगितले.
या एलआरजीबीची यशस्वी उड्डाण चाचणी घेतल्याबद्दल संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष समीर कामत यांनी संपूर्ण डीआरडीओ चमूचे अभिनंदन केले.