केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचे आवाहन
नवी दिल्ली -बालकामगारांकडून काम करून घेतले जात असल्याची घटना आढळल्यास PENCIL या पोर्टलवर किंवा १०९८ या चाईल्डलाईनला फोन करून त्याबाबतची माहिती द्यावी असे आवाहन केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री तसेच वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी केले आहे. बालकामगार विरोधी जागतिक दिनाच्या निमित्ताने स्मृती इराणी यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे की, “शिक्षण आणि आनंदी बालपण हा प्रत्येक बालकाचा हक्क आहे. बालकामगारीशी लढा देण्यासाठी आपण सर्वजण कटीबद्ध आहोत. लोकांच्या मौल्यवान सहकार्यांनेच आपण बालकांना त्यांच्या हक्काचे बालपण मिळवून देवू.”
बालकामगारीच्या घटना आढळल्यास नागरीकांनी https://pencil.gov.in/ या PENCIL पोर्टल वर अथवा चाईल्डलाईन-1098 ला फोन करून कळवावे असे आवाहन त्यांनी दुसऱ्या ट्विटमधून केले आहे. “आपण बालकांचे देणे लागतो- कारण ती आपल्या देशाचे भविष्य आहेत.”, असेही त्यानी म्हटले आहे.
दरवर्षी जगभरात १२ जून हा दिवस बालकामगार विरोधी दिन म्हणून मानला जातो. जगभरातील बालकामगारीकडे लक्ष वेधण्यासाठी आणि तुपाचे उच्चाटन करण्यासाठी कृती व प्रयत्नांची गरज अधोरेखित करण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय कामगार संघटनांनी २००२ पासून बालकामगार विरोधी दिवस साजरा करण्यास सुरुवात केली.