पुणे – जगातील पाच सर्वात शक्तिशाली हवाई दलांपैकी एक अशी भारतीय हवाई दलाची ओळख आहे. महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुष उमेदवारांच्या बरोबरीने काम करत असताना आता भारतीय हवाई दल, भारतीय नौदल आणि भारतीय सैन्य दल या तीनही संरक्षण दलात अधिकारी म्हणून भरतीसाठी मुलींना संधी मिळत आहे. तसेच बारावीनंतर मुली थेट फ्लाईंग ऑफिसर बनू शकतात.
अर्ज करण्याची संधी
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) माध्यमातून भारतीय हवाई दलासह तिन्ही सेवांमध्ये 12 वी नंतर एनडीए प्रवेशासाठी अर्ज मागविले जातात. अर्ज करण्यास इच्छुक महिला उमेदवार आयोगाच्या अर्ज पोर्टल upsconline.nic.in वर करू शकतात.
पात्रता अशी
NDA परीक्षेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या मुली तथा महिला उमेदवारांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयांसह 10+2 परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवार 2021 च्या परीक्षेत बसण्यासाठी 2 जानेवारी 2003 पूर्वी आणि 1 जानेवारी 2006 नंतर जन्मलेला नसावा.
निवड प्रक्रिया व प्रशिक्षण
एनडीए परीक्षेतील कामगिरीच्या आधारावर यशस्वी घोषित केलेल्या उमेदवारांना मुलाखत फेरी आणि वैद्यकीय परीक्षा टप्प्यासाठी बोलावले जाते. वायुसेनेच्या निवडीनुसार तीन वर्षांचे शैक्षणिक आणि शारीरिक प्रशिक्षण दिले जाते. त्यात उत्तीर्ण झालेल्या हवाई दलाच्या कॅडेट्सना जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली यांच्याकडून B.Tech पदवी / B.Sc / B.Sc (संगणक) पदवी प्रदान केली जाईल.
कायमस्वरूपी कमिशनवर नियुक्ती
भारतीय हवाई दलात फ्लाइंग ऑफिसर म्हणून नियुक्ती मिळते. फ्लाइंग किंवा नॉन-टेक्निकल ग्राउंड ड्यूटी शाखेचे कॅडेट्स एअर फोर्स अकॅडमी, हैदराबादला पाठवले जातील आणि एअर फोर्स कॅडेट ग्राउंड ड्यूटी (तांत्रिक शाखा) एअर फोर्स टेक्निकल कॉलेज, बंगळुरूला पाठवली जाईल. हवाई दलाच्या कॅडेट्सना संबंधित अकादमीमध्ये दीड वर्षाचे प्रशिक्षण दिले जाईल. सदर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर कॅडेट्सना भारतीय हवाई दलात फ्लाइंग ऑफिसर म्हणून कायमस्वरूपी कमिशनवर नियुक्ती देण्यात येईल.