त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपळद शिवारात गुरुवार ७ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात देविका भाऊसाहेब सकाळे या सहा वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ब्राह्मणवाडे, वेळूंजे येथील बिबट्याने लहान बालकांना ठार केले असल्याची घटना ताजी असतांनाच आज पुन्हा एकदा पिंपळद येथील शेतावर राहणाऱ्या सकाळे कुटुंबातील एक ६ वर्षाच्या मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, त्र्यंबकेश्वर पासून अवघ्या दोन कि.मी. अंतरावरील पिंपळद येथे गावातून शेतातील घराकडे दोघी बहिणी जात असतांना एक बहिण थोडी मागे चालत होती, रस्त्याच्या कडेला दबा धरुन बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला. तिच्या बहिणीने जोरदार आरडाओरड केली. हा आवाज ऐकुन मुलीचे वडील भाऊसाहेब सकाळे हे जवळच शेतात काम करीत होते. ते हातातील काम सोडून धावले मात्र तोपर्यंत बिबट्याने लहान जिवाला उचलून नेले होते.
घरातील माणसांनी आरडाओरडा करत पाठलाग केला मात्र काही मिटर अंतरावरील ओहळा जवळ बिबटया देविकाला टाकून पळाला. मानेवर जखम झालेली देविका जागीच गतप्राण झालेली होती. सदरची घटना समजताच जेष्ठ नेते संपतराव सकाळे,पप्पू सकाळे, समाधान सकाळे, रोहित सकाळे, यांनी धाव घेऊन मुलीला त्वरीत येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवले. वनविभागाचे भदाणे व त्यांचे सहकार्यांनी घटना स्थळी धाव घेत घटनेची माहिती घेऊन पुढील कार्यवाही केली.
त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बिपीन शेवाळे, पोलीस नाईक सचिन गवळी, श्रावण साळवे, सचिन गांगुर्डे, पो.ह. लोहार, आहिरे, पो. शि. आव्हाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, सदर बालिकेचा मृतदेह त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालया मार्फत नाशिक जिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदणासाठी हलवण्यात आला आहे. संतप्त ग्रामस्थांनी त्र्यंबकेश्वर येथील उपजिल्हा रुग्णालयात वनविभाग कर्मचाऱ्यांना घेराव घालून वेळोवेळी बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करूनही वनविभाग या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष का करत आहे ? असा जाब विचारला. धुमोडी, वेळुंजे, ब्राह्मणवाडे, आता पिंपळद असे एकाच परिसरातील गावांमध्ये आता पर्यंत पाच बालके बळी गेले आहेत. यावेळी तहसिलदार दिपक गिरासे, डॅा. भागवत लोंढे हजर होते.
लोकांचा क्षोभ लक्षात घेऊन परिसरात पाच पिंजरे लावणार असल्याचे वनविभागाचे अधिकारी विवेक भदाणे यांनी सांगितले. तर सदर बिबट्या नरभक्षक झाल्याने त्यास ठार करावे अशी आमदार हिरामण खोसकर यांचे मार्फत मुख्यमंत्री, वनमंत्री यांना भेटुन मागणी करणार असल्याची माहिती संपतराव सकाळे यांनी दिली. ऐन हनुमान जयंतीच्या दिवशी सदर घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.