हरिद्वार (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– रक्षाबंधनाचा घराघरांत भाऊ-बहिणींच्या नात्याची गाठ घट्ट होत असतानाच, उत्तराखंडमध्ये एक वेगळाच सोहळा रंगला. पुणे, मुंबई ,राजगुरुनगर, मंचर ,खेड, नारायणगाव यांसह महाराष्ट्राच्या विविध भागांतील महिला पर्यटक जेव्हा सुरक्षितपणे हरिद्वार येथील बिर्ला गेस्ट हाऊस येथे पोहोचल्या, तेव्हा त्यांनी आज आमचे खरे भाऊ सोबत नसले, तरी गिरीश महाजन आमच्या मदतीला धावून आले, हेच आमच्यासाठी मोठं आहे,” अशा भावना व्यक्त करत त्यांनी मंत्र्यांच्या मनगटावर राखी बांधली. हा क्षण तिथल्या प्रत्येकाच्या मनात कायमचा कोरला गेला.
उत्तराखंडच्या डोंगराळ भागात काही दिवसांपूर्वी अचानक झालेल्या भूस्खलन आणि पुरामुळे प्रवासाला गेलेले महाराष्ट्रातील १७२ पर्यटक भीषण संकटात सापडले. रस्ते बंद, विजेचा पुरवठा खंडित, संवादाचे सर्व मार्ग अडथळ्यांनी भरलेले. महाराष्ट्रातील कुटुंबीयांची चिंता शिगेला पोहोचली. या चिंतेच्या क्षणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावर राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी थेट उत्तराखंडकडे मोर्चा वळवला.
त्यानंतर दोन दिवसांपासून सतत पर्वतीय भागात फिरत, स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधत आणि अडकलेल्या प्रत्येक पर्यटकाशी थेट संवाद साधत, त्यांनी सर्वांना सुरक्षित स्थळी आणण्याची जबाबदारी निभावली. आज सर्व १७२ पर्यटक सुखरूप असून ते महाराष्ट्राकडे परत निघाले आहेत. आजचा दिवस मात्र खास होता, कारण आज रक्षाबंधन! राज्यात अनेक नेते आपल्या कुटुंबासोबत हा सण साजरा करत असताना, मंत्री गिरीश महाजन मात्र आपल्या कुटुंबापासून दूर संकटात सापडलेल्या भगिनींच्या मदतीसाठी हजारो किलोमीटर उत्तराखंडमध्ये होते. ज्या भगिनींचा सखा-भाऊ त्या क्षणी सोबत नव्हता, त्या भगिनींना मंत्री गिरीश महाजन यांना राखी बांधुन हा दिवस साजरा केला. यावेळी त्यांच्या डोळ्यांत पाणी, चेहऱ्यावर आनंद आणि मनात कृतज्ञतेची भावना होती.