इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – खूप कमी चित्रपट करून त्यातून वेगळ्या विषयाला हात घालणारा निर्माता आणि अभिनेता अशी अमीर खानची ओळख आहे. मात्र आमिरचा नुकताच आलेला बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चित्रपट ‘लाल सिंग चड्डा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पुरता आपटला. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर बॉयकॉटचा ट्रेंड सुरू झाला. परिणामी चित्रपटाकडे प्रेक्षकांनी थेट पाठ फिरवली. आता या चित्रपटाच्या बाबतीत पंजाबी गायक आणि अभिनेता गिप्पी ग्रेवालने प्रतिक्रिया दिली आहे.
‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट मला आवडला आणि त्यातील आमिरचा शीख लूकसुद्धा आवडला. आमिरने त्याच्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे भूमिका चोख साकारली आहे. त्याचा शीख लूक एकदम परफेक्ट होता. आमिरचा लूक पंजाब आणि परदेशात सर्वांना खूप आवडला. मात्र, कोणत्याही चित्रपटासाठी चांगला आशय असणं खूप गरजेचं आहे. तसं झालं नसेल तर ते सत्य चित्रपट निर्मात्यांनी स्वीकारावं.” अशी थेट प्रतिक्रिया त्याने दिली आहे.
लाल सिंग चड्डा या चित्रपटाच्या बाबतीत बॉयकॉटचा ट्रेंड सुरू झाला आणि त्याचा परिणाम चित्रपटाच्या कमाईवर झाला. एकीकडे चित्रपट समीक्षक ‘लाल सिंग चड्ढा’चं कौतुक करत असतानाच प्रेक्षकांनी मात्र त्याकडे सरळ पाठ फिरवली आहे. गेल्या ७ दिवसात ‘लाल सिंग चड्ढा’ने ४९.२२ कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट फ्लॉप होण्यामागे बॉयकॉटचा ट्रेंड हे प्रमुख कारण असल्याचं मानलं जात आहे. मात्र गिप्पी ग्रेवालने या चित्रपटाशी संबंधित आणखी एका गोष्टीकडे लक्ष वेधलं आहे. ज्यामुळे चित्रपटाला फटका बसला असल्याचे त्याचे मत आहे.
पंजाबी गायक आणि अभिनेता गिप्पी ग्रेवालने त्याच्या ‘यार मेरा तितलियाँ वरगा’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान लाल सिंग चड्ढाच्या अपयशाबद्दल भाष्य केलं. यासोबतच त्याने चित्रपटात आमिरने बोललेली पंजाबी भाषा आणि त्याचा लहेजा याबद्दलही सांगितलं. गिप्पी ग्रेवाल म्हणाला की, आमिर खानच्या पंजाबी बोलण्यावरून बरीच टीका झाली आहे. त्याचे उच्चार अनेकांना आवडले नाहीत, याच्याशी मी सहमत आहे. जेव्हा आम्ही चित्रपटाच्या संवादांवर काम करत होतो तेव्हा आम्ही योग्य शैली आणि लहेजा ठेवला होता.
गिप्पी ग्रेवालने दावा केला की त्याने आणि त्याच्या टीमने ‘लाल सिंग चड्ढा’चे संवाद लिहिण्यास मदत केली. त्याने अभिनेता-लेखक राणा रणबीरसोबत ‘लाल सिंग चड्ढा’चे पंजाबी संवाद लिहिले. “पण जेव्हा मी चित्रपटाचे काही सीन्स पाहिले तेव्हा सल्ला दिला होता की पंजाबी भाषेचा उच्चार योग्य नाही आणि ते भाग पुन्हा डब करावेत. त्यांनी मान्य केलं, पण ते बदलले गेले नाही. कदाचित त्यांना ते योग्य वाटलं असेल,” असं तो म्हणाला.
Gippy Grewal on Lal Singh Chaddha Movie Failure
Bollywood Flop Aamir Khan Punjabi Singer