आले (ginger)
आल्याशिवाय आपण चहाची कल्पनाच करु शकत नाही. आपण हक्काने सांगतो की, आले टाकूनच चहा करा. याशिवाय आपण खाद्यपदार्थांमध्येही आल्याचा वापर करतो. पण, त्याचे नेमके फायदे काय हे अनेकांना माहित नाही. तेच आज आपण जाणून घेऊया…
संस्कृत नावे … शुंठी ,आर्द्रक, नागर, विश्वभेषज
आल्याचे रोप १ ते १.५ मी. ऊंच असते. पाने १५ ते ३० सेंमी लांब असतात. याचा कंद म्हणजे आले होय. हेच आले विशिष्ट प्रक्रिया करून वाळवले कि सुंठ तयार होते. मात्र आले व सुंठीच्या गुणधर्मात थोडा फरक आहे. याच्या बहुगुणीपणामुळेच याला विश्वभेषज असे समर्पक नांव आहे.
आले व सुंठ दोन्ही चवीला तिखट व ऊष्णगुणी आहेत. कफ व वात कमी करतात. पचन होतांना ते मधुर रस निर्मिती करते.म्हणून ऊष्ण असूनही योग्य प्रमाणात घेतल्यास ते पित्त कमी करते. पण जास्त प्रमाणात घेतल्यास तोंड येणे , जळजळ होणे असा त्रास होतो.
प्रथम आल्याचे गुण बघू :-
१) आले भूक वाढवणारे, पचन सुधारणारे आहे. त्यामुळे भूक व पचनाची तक्रार असणाऱ्यांनी जेवणाच्या सुरूवातीला सैंधव मीठ व आले घ्यावे. यामुळे जिभ ,घसा निरोगी रहातो.त्यावर कफाने चिकटा येते नाही.
२) पोटात वात धरणे( गॅसेस मध्ये) या लक्षणात जेवणानंतरआले व लिंबूरस मुखशुध्दि म्हणून घ्यावा.
३) थंडी व पावसाळयात आले जरूर वापरावे ,त्यामुळे कफ , सर्दी होत नाही.पण उन्हाळयात वापरू नये. ते ऊष्ण पडते.
४) शीतपीत्त म्हणजे अंगावर लाल गांधी ( गाठी) येतात ,त्यावेळी आल्याचा रस जुन्या गुळाबरोबर रोज सकाळी २१ दिवस घ्यावा.
५) खोकला येणे, दम लागणे या लक्षणात आल्याचा रस १/२ चमचा, तुळशीचा रस , १/२ चमचा व मध १ चमचा असे ५ दिवस घ्यावे. उचकी लागत असल्यासपण आलेरस व मध ध्यावे.
६) अर्धे डोके दुखत असल्यास आले रस व गुळ एकत्र करून त्याचे दोन थेंब दोन्ही नाकपुडीत टाकावे.
७) सगळ्या अंगावर सूज येत असेल तर सकाळी उपाशी पोटी गूळ व आलेरस घ्यावा.
८) आले काही प्रमाणात पोट साफ करायचे काम करते.
सुंठीचे गुण :——-
उपयोग :-
बाहेरून :- आमवात, संधीवात , अंगावर पित्त उठने या मध्ये सुंठीचा उगाळून लेप करावा. सर्दी मध्ये छातीत कफ झाल्यास सुंठीचे चूर्ण व तेल एकत्र कोमट करून लावावे. किंवा सुंठ उगाळून तिचा लेप घालावा.
फार घाम येत असल्यास सुंठीचे बारीक चूर्ण त्वचेवर चोळतात.
पोटातून सुंठेचे उपयोग:——
१) सर्वप्रकारच्या वात व्याधींवर सुंठ हे एक उत्तम औषध आहे. सुंठीने वातवाहिन्यांना ( नर्व्हज्) उत्तेजन मिळते, वेदना कमी होतात. सुंठ व गोखरू या वनस्पतीचा काढा रोज सकाळी घेतल्यास कंबर दुखी कमी होते.
२) सुंठ उत्तम पाचक, भूक वाढवणारी, जिभेला चव आणणारी आहे. तोंडाला चव नसणे , मळमळ, उलट्या होणे ,भूक न लागणे, अजीर्ण होणे या लक्षणात सुंठ उपयोगी पडते.
३) कावीळ , मूळव्याध यात सुंठ तिच्या पित्त कमी करणे या गुणांनी उपयोगी पडते.
४) स्त्रीयांच्या बऱ्याच विकारात सुंठ उपयोगी पडते. सौभाग्यशुंठीपाक नावाचे औषध या साठी प्रसिद्ध आहे. यामुळे आमवातात फायदा होतो. शरीराची कांती , ताकद सुधारते.स्रीवंध्यत्वातही तो उपयोगी पडतो.
५) सुंठ चूर्ण ,गुळ व तूप एकत्र करून अर्धा चमचा रोज सकाळी घ्यावे. याने पावसाळयात सर्दी होत नाही. पावसाळयात भिजत काम करणाऱ्या शेतकरी , मजूर यांनी हे रोज घ्यावे.मुलांनाही रोज द्यावे.
६) सुंठ १ मोठा चमचा १ लि. कोमट पाण्यात भिजत टाकून ५-६ तासांनी गाळून ते पाणी प्यायला वापरावे.,यामुळे जुलाब ,पोटफुगी, अजीर्ण हे विकार कमी होतात.सूज, वजन वाढणे या विकारातही फायदा होतो.
७) सुंठ गायीच्या दूधातून घेतल्याने भांगेने चढलेली नशा उतरते.
लक्षांत ठेवा :—— उन्हाळ्यात तसेच ऑक्टोबर मध्ये आले/ सुंठ जपून वापरावे. जठरातील व्रण, मूत्रदाह ,अम्लपित्त असणाऱ्यांनी आले/ सुंठ जपून वापरावे.
आले पाककृती :—— आलेपाक
साहित्य:—— किसलेले आले १ वाटी, खडीसाखर ( खड्याची) बारीक करून दिड वाटी, सायीसहित दूध १ वाटी.
कृती :—— एका जाड बुडाच्या पातेल्यात सर्व साहित्य एकत्र करून मंद गॅसवर ठेवावे .उलथन्याने सारखे हलवावे. चांगला गोळा फिरायला लागला कि,ट्रे मध्ये किंवा पालथ्या ताटाला तूप लावून त्यावर मिश्रण ओतावे. लाटून घ्यावे. गार झाल्यावर अगदी छोट्या छोट्या वड्या कापाव्यात.
पाचक, सर्दी खोकला यावर उपयोगी. प्रवासात खूपच उपयोग होतो. दूधामुळे आल्याचा तीक्ष्णपणा कमी होतो. दूध न घालतापण या वड्या करता येतात. त्या जास्त टीकतात.पण तीक्ष्ण होतात.