मुंबई – एखाद्या कंपनीकडून तुम्हाला गिफ्ट व्हाऊचर मिळाले तर आनंद व्हायला हरकत नाही. पण हे व्हाऊचर घेऊन तुम्ही दुकानात किंवा मॉलमध्ये गेलात तर एकही रुपया लागत नाही किंवा लागणार नाही, असे समजू नका. कारण गिफ्ट व्हाऊचर आणि कॅश बॅक व्हाऊचरवरही १८ टक्के जीएसटी देय असतो.
गिफ्ट व्हाऊचरला आपण बरेचदा पैश्यांमध्ये मोजतो. म्हणजे ५०० किंवा १००० रुपयांचे व्हाऊचर असेल तर आपण त्याकडे ५०० किंवा १००० च्या नोटप्रमाणेच बघतो. जीएसटीशी संबंधित अॅडव्हान्स रुलिंग अॅथॉरिटी ( एएआर)ने सांगितले आहे की, ग्राहकांना मिळणारे गिफ्ट व्हाऊचर किंवा कॅशबॅक व्हाऊचरवर १८ टक्के जीएसटी देणे बंधनकारक आहे.
बंगळुरू येथील प्रिमीयम सेल्स प्रमोशन प्रायव्हेट लिमीटेड कंपनीने या व्हाऊचरवर लागणाऱ्या जीएसटी दरांच्या विरोधात एएआरच्या कर्नाटक येथील खंडपिठात आव्हान दिले आहे. संबंधित कंपनी गिफ्ट व्हाऊचरचा व्यवहार करते. या कंपनीने गिफ्ट व्हाऊचर खरेदी केले आणि आपल्या क्लायंटला विकले. त्यानंतर त्यांनी या व्हाऊचरला आपल्या क्लायंट/ग्राहकांमध्ये वाटून दिले, असे प्राधिकरणाच्या लक्षात आले.
कॅश बॅक व्हाऊचर आणि इतर असे ई-व्हाऊचर वापरण्याच्या वेळी रुपयांमध्ये मोजले जाऊ शकत नाहीत. त्यांची गणना केवळ एखाद्या वस्तूप्रमाणे होते, असे निरीक्षण प्राधिकरणाने नोंदविले. ज्यावेळी बील देण्याची वेळ येते तेव्हाच त्यांना पैश्यांमध्ये मोजले जाते. त्यामुळे त्यावर १८ टक्के जीएसटी द्यावाच लागतो, असेही प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.