मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी काही तासातच टायटनच्या शेअर्समध्ये सुमारे 342 कोटी रुपये कमावले आहेत. 2022 च्या अर्थसंकल्पात कट आणि पॉलिश्ड हिऱ्यांवरील कस्टम ड्युटी कमी करण्याच्या घोषणेनंतर टायटन कंपनीच्या शेअर्समध्ये एकाच तासात मोठी उसळी पाहायला मिळाली. टायटन हे जेम्स अँड ज्वेलरी व्यवसायात आहे. अर्थसंकल्प 2022 च्या प्रस्तावामुळे कंपनीचा व्यवसाय मजबूत होईल, असे शेअर बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे. दि.1 फेब्रुवारी रोजी, दुपारी 1.15 च्या सुमारास, टायटन कंपनीच्या समभागांनी इंट्रा-डे नीचांकी 2,358.95 रुपये इतकी एका दिवसाच्या व्यवहारातील नीचांकी पातळी गाठली होती. परंतु यानंतर अर्थसंकल्पोत्तर रॅलीमध्ये टायटन कंपनीच्या शेअर्समध्ये चांगलीच उसळी पाहायला मिळाली. कंपनीचे शेअर्स 2,436.05 रुपयांवर बंद झाले. कंपनीचे शेअर्स 75.75 रुपयांनी वधारले.
टायटनच्या शेअर्सच्या वाढीमुळे राकेश झुनझुनवाला यांच्या संपत्तीत अंदाजे 342 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. या बाबत तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, टायटनचे शेअर्स 2820 रुपयांपर्यंत जाऊ शकतात. कारण टायटन कंपनीच्या ऑक्टोबर-डिसेंबर 2021 च्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, राकेश झुनझुनवाला यांच्याकडे टायटनचे 3,57,10,395 शेअर्स आहेत, ते कंपनीच्या एकूण जारी केलेल्या पेड-अप भांडवलाच्या 4.02 टक्के आहे. त्याच वेळी, त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटनमध्ये 95,40,575 शेअर्स आहेत आणि कंपनीमध्ये 1.07 टक्के हिस्सा आहे. राकेश झुनझुनवाला आणि त्यांच्या पत्नीच्या कंपनीत एकूण हिस्सा 5.09 टक्के इतका आहे. अल्पावधीत टायटन कंपनीचे शेअर्स 2,500 रुपयांपर्यंत जाऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्याच वेळी, कंपनीचे शेअर्स दीर्घ मुदतीसाठी 2,820 रुपयांपर्यंत जाऊ शकतात, असाही अंदाज आहे.