घोटी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काळया बाजारात ६ लाख ३६ हजार रुपयांचा रेशनचा तांदूळ विक्रीसाठी घेऊन जात असतांना पोलिसांनी तो सापळा रचून पकडला. या घटनेत घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घोटी – खैरगांव मार्गावर आयशर क्रमांक ( एमएच, १७ एजी, ५६६६ ) वाहनातून हा तांदूळ काळया बाजारात विक्रीसाठी जात होता.
दरम्यान संशयित आरोपी भाऊसाहेब नेरकर,श्रावण सोनवणे रा. कोकमठाण (ता. संगमनेर), अर्जुन मरसाळे रा. कोपरगाव यांना अटक करण्यात आली आहे. आयशर वाहनासहित २७० गोण्या तांदूळ असा १८ लाख ३६ हजार रुपा्यांचा मुद्देसूद पोलिसांनी जप्त केला आहे. या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शाहजी उमाप यांना गोपनीय पद्धतीने मिळताच त्यांनी घोटीचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांना खबर दिली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने पाळत ठेवली. साडे बारा वाजे दरम्यान आयशर वाहन हे रेशनचा तांदूळ खैरगांव मार्गावर खाली करण्यासाठी आला असता, पोलीस पथकाने छापा टाकला.
यावेळी वाहन चालक, क्लिनर यांना ताब्यात घेण्यात आले. पण, इतरांनी पोबारा केला..प्लास्टिक गोण्यांतुन रेशनचा तांदूळ विक्रीसाठी आणण्यात आला होता. या घटनेबाबत पोलिसांनी तहसीलदार कार्यालयात कळवल्यानंतर पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार भागवत ढोणे यांनी पुढील कारवाई केली.