घोटी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – घोटी पोलीस स्टेशन हद्दीतून अवैधरीत्या गुटख्याची वाहतुक करणा-या कंटरनेला पोलिसांनी सापळा रचून पकडले. या कंटनेरमध्ये महाराष्ट्रात वाहतुक व विक्रीला प्रतिबंध असलेला २२ लाख ४६ हजार ४०० किमतीचा ४ k star सुगंधीत मसाला, तंबाखु ( गुटखा ) त्यात प्रमाणे वाहतुक करणारा कंटेनर किंमत १० लाख असा एकुण ३२ लाख ४६ हजर ४०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणात घोटी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन वाहनाचा चालक राजु सुभाष पाटील (३१), रा. कुडुसगाव, ता. वाडा. जि. पालघर, सध्या राहणार कर्नाटक, सर्फराज फकिर पाशा, (३२), रा. दुबुलगुडडी, ता. हुन्नाबाद, जि. बिदर, कर्नाटक या दोघांना अटक केली आहे.
पोलीस अधिक्षक यांना घोटी पोलीस स्टेशन हद्दीतुन अवैधरीत्या गुटख्याची वाहतुक होणार असल्याची गुप्त बातमी मिळाली. त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांना कार्यवाहीच्या सूचना दिल्या. त्यानुसार घोटीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, पोलीस कर्मचारी यांना मार्गदर्शन केले. शनिवारी रात्री पासुन घोटी टोलनाका परीसरात नाशिककडून मुंबईकडे जाणारा संशयित कंटेनर क्र. एमएच १२ एसएक्स ९८४३ याला पकडण्यासाठी सापळा रचला. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
पुढील तपास पोलीस अधिक्षक शहाजी उमाप यांचे मार्गदर्शनाखाली घोटीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी सुरु केला आहे. ह्या कामगिरीमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, श्रध्दा गंधास, पोना झाल्टे, पोना कोठुळे, पोशि गायकवाड, पोहवा शिंदे, पोना करंडे सहभागी होते. महामार्ग व इतर मार्गावरुन गुटखा, अंमली पदार्थाची वाहतुक होत असल्यास तात्काळ घोटी पोलीस स्टेशन किंवा नियंत्रण कक्ष नाशिक ग्रामीण येथे कळवावे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन पोलिसांनी केले आहे.