घोटी – सिन्नर मार्गावरील पांढुर्ली आणि भगूर शिवारात सापळा लावून दोन कारसह दारूसाठा असा सुमारे साडे पाच लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या कारवाईत एका संशयीतास अटक करण्यात आली असून दुसरा चालक वाहनसोडून पसार झाला आहे. भरारी पथक क्रं.१ चे दुय्यम निरीक्षक यशपाल पाटील यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे शुक्रवारी (दि.११) पथकाने घोटी सिन्नर मार्गावरील समरा वाईन्स नजीकच्या पांढर्ली शिवार ता.सिन्नर येथे नाकाबंदी लावत वाहन तपासणी केली असता सॅन्ट्रो कार एमएच ०४ सीजे ६८६६ मधील मद्यसाठा पथकाच्या हाती लागला. अनिल सिताराम साळुंखे (३२ रा.सिकाराबाद सोसा.संसरी लेन नं.२ देवळाली कॅम्प) या चालकास बेड्या ठोकत केलेल्या वाहन तपासणीत ब्लेंडर प्राईड,ऑफिसर चॉईस,रॉयल स्टॅग,मॅकडॉल,एम्प्रीयल ब्ल्यू आदींसह विविध प्रकारचा विदेशी आणि राज्यात विक्रीस बंदी असलेला केंद्रीयशासित मद्यसाठा मिळून आला. वाहनासह मद्यसाठा असा सुमारे ३ लाख ३४ हजार २४० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून ही कारवाई दुय्यम निरीक्षक अरूण सुत्रावे,जवान सुनिल दिघोळे,धनराज पवार,महेंद्र भोये,राहूल पवार व अनिता भांड आदींच्या पथकाने केली. दुसरी कारवाई भगुर ता.जि.नाशिक येथील विजयनगर पेट्रोलपंपाजवळील रेल्वे पुल भागात करण्यात आली. क विभाग भरारी पथकाने या भागात सापळा लावला असता पथकाची चाहूल लागताच चालक वर्दळीची संधी साधत आपले वाहन सोडून पसार झाला. बेवारस स्थितीत मिळून आलेल्या एमएच १५ सीएम ९६४६ या कारवाईच्या तपासणीत ब्लेंडर प्राईड,रॉयल स्टॅग,मॅकडॉल असा विविध प्रकारचा केंद्रशासित व राज्यात विक्रीस बंदी असलेला दारू साठा मिळून आला. या कारवाईत वाहनासह २ लाख १३ हजार २०० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. निरीक्षक गंगाराम साबळे,दुय्यम निरीक्षक अहिरराव,सहाय्यक दुय्यम निरीक्षक मनोहर गरूड,जवान विरेंद्र वाघ,राजेंद्र चव्हाणके,सुनिता महाजन,वंदना देवरे आदींच्या पथकाने केली.