घोटी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील प्रसिध्द तांदूळ व्यापाऱ्यास नफ्याचे आमिष दाखवून बोरिवली येथील दोघांनी ३८ लाखाला गंडा घातला आहे. या फसवणूक प्रकरणी व्यापारी लक्ष्मण काळे यांनी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरुन घोटी पोलिस स्थानकात भरत बर्मन व जयेश बर्मन यांच्याविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दक्षिण आफ्रिकेत व परदेशात तांदळाचे भाव वाढले आहेत. तुम्ही निर्यात केली तर चांगली किंमत मिळू शकेल. तुमचा तांदूळ निर्यात करण्यासाठी आम्ही मदत करू, असे वेळोवेळी सांगून अगोदर काळे यांचा विश्वास संपादन करुन ही फसवणूक करण्यात आली. संशयितांना २५ किलो वजनाची एक बॅग असा ११९ टन वजनाचा तांदूळ पॅकिंग करून न्हावाशेवा बंदरात पाठवून दिला. दरम्यान या तांदळाचा वाहतूक खर्च म्हणून सात लाख ५० हजार रुपये दिले. त्यानंतर संशयितांनी आपण स्वतःच व्यापारी काळे असल्याचे भासवून काळे यांचा तांदूळ स्वतःच्या नावाने निर्यात करून आलेल्या रकमेचा अपहार केला. यासह विविध कारणांनी वेळोवेळी रोख व इतर माध्यमांतून संशयितांनी काळे यांची एकूण ३८ लाख ३७ हजार ४९७ रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या फसवणूक प्रकरणाचा सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.