घोटी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – घोटी टोलनाका परिसरात अवैध गुटख्यासह २७ लाखांचा मुद्देमालनाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने हस्तगत केला. शनिवारी पहाटेचे सुमारास मुंबई आग्रा महामार्गाने नाशिक मार्गे मुंबई बाजूकडे काही संशयीत इसम मालवाहू ट्रकमध्ये गुटख्याची अवैधरित्या वाहतुक करून विक्री करण्याचे उद्देशाने जाणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांना मिळाली होती. या माहितीनंतर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली.
या छाप्यात टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक एम.एच.०३.डी.व्ही.७७९१ यामध्ये अवैधरित्या गुटख्याची वाहतुक करणारे अली हसन गुलाम हुसेन, रा. गोवंडी, शिवाजीनगर, ठाणे, मेहताब इबरार अली, वय २२, रा. हरैया, ता.बासी, जि. सिध्दार्थनगर, उत्तरप्रदेश यांना ताब्यात घेतले. सदर इसम हे चोरटया रितीने गुटख्याची वाहतुक करतांना मिळून आले असून त्यांचे कब्जातून वाराणसी आशिक व शुध्द प्लस सिल्व्हर सुगंधीत गुटख्याचा ७ लाख ५० हजार ९२० रूपये किंमतीचा अवैध गुटखा व टाटा ट्रक क्रमांक एम.एच.०३.डी. व्ही. ७७९१ असा एकुण २७ लाख ५० हजार ९२० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या आरोपीविरुध्द घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयात दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व घोटी पोलीस करीत आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, सपोनि संदेश पवार, पोलीस अंमलदार प्रकाश कासार, विनोद टिळे, प्रदिप बहिरम, हेमंत गिलबिले यांनी सदरची कारवाई केली आहे. गुटखा विरोधी कारवाई आणखी तीव्र करण्यासाठी सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना सूचना देण्यात आलेल्या असून, याकामी पोलीसांकडून कारवाई करण्यात येणार आहे.