नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वाटाण्याच्या गोण्या वाहून नेणाऱ्या कंटनेरच्या ड्रायव्हरने गोण्यांची परस्पर विल्हेवाट लावल्याप्रकरणी ट्रक चालकांविरुध्द घोटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ८१७ गोण्याची किंमत १६ लाख ४८ हजार ८४३ रुपये असल्याचे सांगण्यात आले. ही घटना मालेगाव ते घोटी दरम्यान घडली असून संबंधित ट्रक मुंबई- आग्रा महामार्गावर घोटी येथे आढळून आला.
हा कंटनेर उत्तर प्रदेशहून नवी मुंबईच्या वाशी इथे जाणार होता. पण, मालेगावपासून या कंटनेरचे लोकेशन ट्रेस होत नसल्याने मालकाला शंका आली, त्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. हा रिकामा कंटनेर चालकाने घोटी येथे उभा केला होता. त्यानंतर ड्रायव्हर पसार झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतर आता सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने ड्रायव्हरचा शोधही घेतला जात आहे. न्यू गुडविल फास्ट कॅरीयर, या वाशी येथील कंपनीचे मालक अरुण कुमार यादव यांनी घोटी पोलीस ठाण्यात ड्रायव्हरविरोधात फिर्याद दिली आहे.
उत्तर प्रदेशचे अरुण कुमार यादव यांनी आपल्या ट्रान्सपोर्टमधून हा कंटनेर पाठवला होता. या कंटनेरचे चालक संजय कुमार रामबच्चन हा कंटनेर घेऊन वाशीला पोहोचवणार होता. पण, त्याने परस्पर विल्हेवाट लावत पळ काढला. आता याप्रकरणी घोटीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय कवडे यांनी आपल्या पथकासह तपास सुरु केला आहे.