मुंबई- कोणाचे नशीब कधी फळफळेल याची काहीच शास्वती देता येत नाही. रावाचा रंक किंवा रंकाचा राव होण्यासाठी जास्त कालावधी लागत नाही. आपापल्या कर्मामुळे प्रत्येकाला हा अनुभव येतो. पण पालघर जिल्ह्यातील मच्छिमारांचे नशीब रातोरात बदलल्याची घटना घडली आहे. एका विशेष प्रकारचे मासे पकडल्यानंतर ते करोडपती झाले आहेत. पालघर जिल्ह्यातील मुरबे गावातील मच्छिमार चंद्रकांत तरे आपल्या आठ सहकार्यांसोबत मासेमारीसाठी समुद्रात गेले होते. २८ ऑगस्टला रात्री त्यांच्या जाळ्यात एक-दोन नव्हे, तर १५७ घोळ मासे अडकले. एका घोळ माशाची किंमत ८५ हजार रुपये इतकी असते. चंद्रकांत तरे यांच्या पथकाकडून उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आलेल्या व्यापार्यांनी हे मासे १.३३ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले. माशांचा लिलाव पालघर येथील मुर्बे येथे झाला. समुद्रात प्रदूषणाचा स्तर वाढल्याने हे विशेष मासे किनार्यावर सहज सापडत नाहीत. हे मासे पकडण्यासाठी मच्छिमारांना समुद्राच्या खूप आत जावे लागते. सर्व मच्छिमार समुद्र किनार्यापासून २० ते २५ नॉटिकल माइल इतक्या आत वाधवानकडे गेले होते.
घोळ माशाचे महत्त्व काय?
घोळ माशामध्ये औषधाचे गुण असतात. तिचे प्रोटोनिबिया डायकँथस असे वैज्ञानिक नाव आहे. ही एक प्रकारचा क्रोकर मासा असतो. सोन्याचे हृदय असलेला मासा असेही त्याला संबोधले जाते. या माशाचा वापर वैद्यकीय उपचार, औषधे आणि कॉस्मेटिक्ससाठी केला जातो. त्यामुळे माशाला हजारोंची किंमत मिळते. थायलंड, इंडोनेशिया, जापान, सिंगापूर यासारख्या देशांमध्ये या माशांना खूप मागणी आहे. शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणारे गळून जाणारे धागे याच माशांचा वापर करून बनविले जातात.