मुंबई – मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विकासकामांचा संपूर्ण राज्याला अभिमान वाटावा असे काम मुंबई महापालिकेने केले असल्याचे गौरवोद्गार श्री. ठाकरे यांनी आज येथे काढले. घाटकोपर – मानखुर्द जोड मार्गावरील नवीन उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाला असून या उड्डाणपुलाचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक, खासदार राहुल शेवाळे, आमदार मनोज कोटक, रईस शेख, आयुक्त इक्बाल सिंह चहल व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी असल्यामुळे आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. याचदिवशी जनतेच्या हितासाठीच्या कामांचे लोकार्पण होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या पुलाचे काम सुरू होते. यापूर्वी रस्त्याच्या दुरावस्थेमुळे या मार्गाने प्रवास करण्याची इच्छा होत नव्हती. मात्र आता हा उड्डाणपूल झाल्यामुळे रोज या पुलावरून प्रवास करण्याची इच्छा होत आहे. वीरमाता जिजाबाई भोसले मार्गावर (घाटकोपर-मानखुर्द जोडमार्ग) बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलामुळे प्रवासातील अनावश्यक वेळ वाचणार असून वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प उपयुक्त आणि जनहिताचा आहे. जनहिताचे प्रकल्प उभारण्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेचा हातखंडा असून त्याबद्दल एक मुंबईकर म्हणून महानगरपालिकेचा मला नेहमी अभिमान वाटतो. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनांच नव्हे तर संपूर्ण राज्याला अभिमान वाटेल असे काम मुंबई महापालिकेने केले असल्याचे गौरवोद्गार श्री. ठाकरे यांनी यावेळी काढले.
उड्डाणपुलांसारख्या विकासकामांच्या माध्यमातून दुरावा कमी होवून वेळेची बचत होत आहे हे आपण अनुभवतो आहोत. जनतेने शासनाला जनहिताची कामे करण्याची संधी दिली आहे त्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. राज्य सरकारने जनतेला दिलेले वचन आजपर्यंत पाळले आहेत आणि ते यापुढेही पाळले जाईल. या उड्डाणपुलाची दक्षता घेण्याची जबाबदारी सर्वांची आहे. ‘दृष्टी आड सृष्टी’ अशी स्थिती होऊ देऊ नका. पूर्वी या परिसरातील वस्त्या बकाल असायच्या आता या वस्त्यांतील नागरिकांचे राहणीमान उंचावेल यासाठी काम केले पाहिजे, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी मिळून उपयुक्त आणि आखीव-रेखीव अशी विकासकामे करणे आवश्यक असते. घाटकोपर-मानखुर्द जोडरस्त्यावरील उड्डाणपुलाने प्रवासातला वेळ वाचण्याचा विचार केला तसा पुलाच्या आजुबाजूच्या वसाहतींना चांगली घरे देण्यासाठी देखील विचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा. जनतेचं सहकार्य असेल तर चांगली विकासकामे निश्चित होतात. स्वच्छ आणि सुंदर परिसर निर्मितीसाठी आराखडा तयार करावा,अशा सूचना श्री. ठाकरे यांनी यावेळी दिल्या.
कोरोना महामारीच्या संकटात मुंबई मॉडेल म्हणून जगभरात ओळख निर्माण झाली याचा मुंबईकर म्हणून मला अभिमान आहे. याच श्रेय महापालिका प्रशासन आणि नागरिकांना जाते. कोरोनाच्या संकटात विकासाची गती थोडी मंदावलेली असली तरी विकास कामे थांबलेली नाहीत. महापालिकेमार्फत सुरु असलेल्या कामांना आजपर्यंत राज्य शासनाने सहकार्य केलेले आहे. जनतेला सुखी, समाधानी आणि आनंदाचे आयुष्य लाभावे. यासाठी महापालिका करीत असलेल्या प्रयत्नांना राज्य शासनाचा पाठिंबा राहील.
येथील एम पूर्व विभागातील वीर जिजामाता भोसले मार्गावर हा उड्डाणपूल बांधण्यात आला असून त्यामुळे परिसरातील रहदारी मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. हा उड्डाणपूल शिवाजी नगर जंक्शन ते मोहिते पाटील जंक्शनपर्यंत 2.90 किमी लांबीचा आहे. या उड्डाणपुलामुळे शिवाजी नगरजंक्शन, बैंगनवाडी जंक्शन, देवनार डंपिंग ग्राउंड, फायर ब्रिगेड व मोहिते पाटील हे परिसर वाहतूक कोंडीतून मुक्त होण्यास मदत होणार आहेत. त्याचबरोबर नवी मुंबई, पनवेल, पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांचा 25-30 मिनीटांचा वेळही वाचणार आहे.