नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- म्हसरूळ शिवारातील केतकीनगर भागात रविवारी (दि.११) दोन घरे फोडून चोरट्यांनी सुमारे तीन लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात ७० हजाराच्या रोकडसह सोन्या चांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी पोलीस दप्तरी घरफोडीचा एकत्रीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कृष्णा काशिनाथ आहिरे (रा.कृष्ण विद्या रो हाऊस,केतकीनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. आहिरे कुटूंबिय रविवारी बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याचांदीचे दागिणे चोरून नेले.
याचवेळी परिसरातील स्वप्निल सोमनाथ जोशी (रा.नादब्रम्ह सोसा.केतकीनगर) यांचेही घर फोडण्यात आले असून चोरट्यांनी जोशी यांच्या घरातील रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांवर डल्ला मारला. दोन्ही घटनांमध्ये ७० हजाराच्या रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे असा ३ लाख ५ हजाराचा मुद्देमाल भामट्यांनी पळविला असून अधिक तपास सहाय्यक निकीक्षक विष्णू हळदे करीत आहेत.