नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ग्रामीण भागातील सर्व बेघर कुटुंबांना आणि कच्चे आणि मोडकळीस आलेल्या घरात राहणाऱ्यांना मूलभूत सुविधांसह पक्के घर उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना राबवली जाते. यानुषंगाने राज्यातील सर्व जिल्ह्यांना घरकूल योजनेंतर्गत उद्दिष्ट देण्यात आले आहे यामध्ये नाशिक जिल्ह्याला सर्वाधिक १ लाख ४६ हजार ६४ घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. राज्यात सर्वाधिक उद्दिष्ट नाशिक जिल्ह्याला मिळाले असतांना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या तत्परतेने १ लाख ३७ हजार ६३० घरकुलांना मंजूरी मिळाली आहे.
राज्य शासनाच्या १०० दिवस उपक्रमात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणचा समावेश असून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून तत्परतेने घरकूल योजनेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी काम केले जात आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सर्वांसाठी घरे हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवत ग्रामीण भागातील बेघर व कच्चे आणि मोडकळीस आलेल्या घरात राहणाऱ्या नागरिकांना मूलभूत सुविधांसह पक्के घर उपलब्ध करून देण्यात येते. योजनेंतर्गत घरकुल बांधण्यासाठी १ लाख २० हजार रुपयांचे अर्थसाहाय्य केले जाते. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत नाशिक जिल्ह्याला संपूर्ण राज्यात सर्वाधिक उद्दिष्ट प्राप्त झाले होते. सर्वाधिक उद्दिष्ट असतांना देखील नाशिक जिल्ह्याने आजपर्यंत ९५% उद्दिष्ट गाठत घरकूल मंजुरीत जिल्ह्याला अव्वल स्थान प्राप्त करून दिले आहे. लवकरच घरकूल योजनेचा पहिला हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाणार असल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे यांनी दिली.
पहिला हप्ता लवकरच
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना घरकूलाचा लाभ दिला जातो, राज्य शासनाच्या १०० दिवस कार्यक्रमांतर्गत घरकूल योजनेचे उद्दिष्ट पूर्ततेच्या दृष्टीने कार्यवाही केली जात असून उद्दिष्टानुसार ९५% घरकुलांना मंजूरी प्राप्त झाली आहे. घरकूल योजनेचा पहिला हप्ता लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यावर दिला जाणार आहे.
आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक