अहिल्यानगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यातील अनुसूचित जातीच्या एक हजार उमेदवारांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे व निटकॉन, दिल्ली या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने तीन महिने कालावधीचे जर्मन भाषेचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी प्रशिक्षणासाठी २५ मार्च २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी दिलावर सय्यद यांनी केले आहे.
जर्मनीमध्ये उपलब्ध असणाऱ्या रोजगाराच्या संधींच्या अनुषंगाने राज्यातील पात्र उमेदवारांना हे प्रशिक्षण देण्यात येत आहे. यामध्ये नर्सिंग, लॅब असिस्टंट, डेंटल असिस्टंट,फिजिओथेरीपीस्ट, हाऊसकिपर, क्लिनर, हॉटेल मॅनेजमेंट यासाठी पदविका अथवा पदवी आवश्यक आहे. ॲडमिनीस्ट्रेशनसाठी बीसीए, बीबीए अथवा पदवी, अकाऊंटींगसाठी बी.कॉम अथवा एम. कॉम., मार्केटींग व सेल्ससाठी एम.बी.ए. अथवा डिग्री, इलेक्ट्रीशियनसाठी आय.टी.आय., पदवीका अथवा पदवी आवश्यक आहे.
उमेदवार हा १८ ते ३५ वयोगटातील महाराष्ट्राचा रहिवासी असावा आणि त्याच्याकडे अनुसूचित जातीचा दाखला असावा. उमेदवाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाखापर्यंत असावे. आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता आवश्यक आहे.
प्रशिक्षणासाठी १०० गुणांची चाळणी परीक्षाही घेण्यात येणार आहे. उमेदवारांना प्रतिमाह ४ हजार रुपयांचे विद्यावेतन देण्यात येणार आहे. प्रशिक्षण प्राप्त उमेदवारांना गोईते संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी सहाय्य करण्याबरोबरच पासपोर्ट, व्हिसा व अन्य आवश्यक कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी सहाय्य करण्यात येणार आहे.
प्रशिक्षणासाठी विहित नमून्यातील परिपूर्ण अर्जासोबत विहित नमून्यातील प्रतिज्ञापत्र, शैक्षणिक व व्यावसायिक प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा/जन्म दाखला, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/डोमेसाईल प्रमाणपत्र, अनुसूचित जातीचा दाखला, जात पडताळणी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट आकाराची छायाचित्रे व प्रशिक्षणासाठी नोंदविलेल्या नावाच्याच बँक पासबुकची छायाकिंत प्रत कागदपत्र पडताळणीवेळी दोन प्रतीमध्ये सादर करणे बंधनकारक राहील.
उमेदवारांनी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScFe0PyWuNerakeoKHIJAhUThgMUJZc_EQbWcEZTzdsnIjC9g/viewform या लिंकद्वारे अर्ज भरुन निटकॉन प्रशिक्षण केंद्र, प्रोफेसर कॉलनी चौक, आकाशवाणी शेजारी, अहिल्यानगर या केंद्रावर सादर करावेत. प्रशिक्षणाच्या अटी व शर्ती तसेच अधिक माहितीसाठी ९०२२७७०८६६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.