अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
गेली दोन वर्षे कोरोना काळात रेल्वेचे वेळापत्रक पूर्णतः कोलमडल्याचे दिसून आले. आता मात्र कोरोनाचा संसर्ग कमी झाला असल्याने रेल्वे वेळापत्रक पुन्हा रुळावर आले आहे आणि नियोजनानुसार गाड्यांची ये – जा सुरु आहे. आता येत्या २९ जूनपासून मध्य रेल्वेच्या १६५ गाड्यांमध्ये जनरल तिकिटांची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यामुळे तब्बल दोन वर्षांनंतर प्रवाशांना जनरल तिकिटावर प्रवास करणे शक्य होणार आहे.
प्रत्येक सामान्य माणसासाठी रेल्वे प्रवास हा सोईस्कर पर्याय आहे. जवळचा प्रवास असो वा लांबचा. रेल्वेला प्रथम प्राधान्य दिले जाते. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे मात्र रेल्वेच्या प्रवासावरदेखील निर्बंध आले होते. रेल्वेमध्ये होणारी गर्दी पाहता कमी प्रमाणात रेल्वे सोडण्यात येत होत्या. तसेच जनरल तिकिटांची सुविधादेखील बंद करण्यात आली होती. कोरोनाकाळात खबरदारीचा उपाय म्हणून आणि गर्दी टाळण्यासाठी म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता. केवळ आरक्षण केल्यानंतरच रेल्वे प्रवास करता येत होता. पण रेल्वेनीच ये जा करण्याची सवय असलेल्यांची मात्र यामुळे कुचंबणा होत होती.
तिकिट आरक्षण मिळाले नाही तर इतर पर्यायांकडे वळावे लागत होते व त्यासाठी जादा पैसेही भरावे लागत होते. आता मात्र पुन्हा जनरल तिकिटाची सोय उपलब्ध झाली असल्याने रेल्वेनेच प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जर पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाला तर या विचारावर फेरविचार करण्यात येईल. पण तोपर्यंत मध्य रेल्वेच्या १६५ गाड्यांमध्ये जनरल तिकिटाची सेवा उपलब्ध करुन दिली जाईल. येत्या २९ जूनपासून ही सेवा उपलब्ध होणार आहे.