नवी दिल्ली – नऊ वर्षांपूर्वी धुमधडाक्यात लग्न करून घरी वधूला आणणारा रेल्वे अभियंता राजेश पांडेय आता सोनिया बनून लग्न करण्याच्या तयारीत आहे. त्याने सोनिया बनण्यासाठी चार वर्षांपूर्वी मोठी शस्त्रक्रिया केली. लिंग बदलल्यानंतर नवीन ओळख मिळविण्यासाठी त्याला रेल्वे विभागातही मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावे लागले. नव्या वर्षात नव्या जीवनात प्रवेश करणार्या सोनियाने सांगितले की, ती आता आता राजेश या नावाशी आणि त्याच्याशी निगडित प्रत्येक ओळख पुसून टाकण्यास यशस्वी झाली आहे.
राजेश झाला सोनिया
इज्जतनगर येथील मुख्य कारखाना व्यवस्थापक कार्यालयात सोनिया (पूर्वाश्रमीची राजेश पांडेय) प्रथमश्रेणी तांत्रिक पदावर कार्यरत आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर अनुकंपा तत्वावर १९ मार्च २००३ रोजी राजेश रेल्वेमध्ये भरती झाला. कुटुंबात चार बहिणी आणि आई आहे. २०१७ मध्ये राजेश याने लिंग बदलले आणि स्त्री झाला. त्याने स्वतःचे नाव सोनिया ठेवले. पुरुष कर्मचारी स्त्री होण्याचे हे रेल्वे विभागातील पहिलेच प्रकरण आहे.
रेल्वे विभागाकडे साकडे
इज्जतनगर येथील मुख्य कारखाना व्यवस्थापक कार्यालयात प्रथमश्रेणी तांत्रिक पदावर तैनात राजेश पांडेय याचा एक वेगळे प्रकरण समोर आले होते. लिंग परिवर्तन केल्यानंतर रेल्वे विभागाच्या नोंदणीत त्याचा महिला उल्लेख करावा अशी त्याने मागणी केली होती. प्रकरण दुर्मीळ आणि वेगळे असल्याने इज्जतनगर येथील विभागाने ईशान्य रेल्वे महाव्यवस्थापक कार्यालयाकडे दिशानिर्देश मागविले. महाव्यवस्थापकांनी हे प्रकरण रेल्वे मंडळाकडे पाठविले. अखेर रेल्वे मंडळाच्या निर्देशानुसार राजेशच्या पासवर आणि वैद्यकीय कार्डवर महिला असा उल्लेख करण्यात आला.
महिला ओळख कशी
मुख्य कारखाना प्रशासनाने वैद्यकीय मंडळाच्या अहवालाच्या आधारावर जेंडर डिस्फोरिया म्हणजेच एका लिंगातून दुसर्या लिंगात प्रवेश करण्यास इच्छुक म्हणून महिलेची ओळख दिली. पुरुषाचा देह असला तरी महिलांचे गुण असणे किंवा महिलेचा देह असला तरी पुरुषांचे गुण असणे यालाच जेंडर डिस्फोरिया म्हणतात. माणसामधील हार्मोन बदलल्यामुळे हे बदल घडतात.
शृंगार करण्याची आवड
सोनिया म्हणाली, की वडिलांच्या मृत्यूनंतर मृताच्या कोट्यातून तिला २००३ मध्ये बरेली येथील रेल्वे कार्यशाळेत नोकरी लागली होती. तिच्यामध्ये नेहमीच महिलांसारख्या भावना येत होत्या. ती एक स्त्री आहे असे वाटत होते. तिला महिलांसारखा शृंगार करण्याची आवड होती.
दोन वर्षे टिकले लग्न
कुटुंबीयांनी २०१२ मध्ये राजेशचे मोठ्या धुमधडाक्यात लग्न लावून दिले होते. पती-पत्नी सहा महिने सोबत राहिले, परंतु ते एकमेकांच्या जवळ कधीच आले नाही. हे लग्न दोन वर्षेच टिकू शकले आणि पत्नीने घटस्फोट घेतला, असे सोनिया सांगते.
२०१७ मध्ये शस्त्रक्रिया
सोनिया सांगते, घटस्फोट घेतल्यानंतर दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करून लिंग परिवर्तन करून घेतले. त्यानंतर महिला म्हणून स्वीकारावे यासाठी तिने प्रयत्न सुरू केले.