नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पशुधन विकासासाठी शासनाने पैदास धोरण बदलून त्यामध्ये देशी गोवंशवर भर देण्याचे ठरविले आहे. दिवसेंदिवस जातीवंत गीर गोवंश नामशेष होण्याच्या मार्गावर असून त्यांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. इंडीजिनस फार्म आणि आर्मर हेलिक्स इंडियाने नाशिकमध्ये उभारलेला ५० जातीवंत गीर कालवड पैदास प्रकल्प वाखण्यासारखा आहे. असे प्रकल्प राज्यभर राबवले गेल्यास कृषी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांना रोजगार मिळू शकेल असे प्रतिपादन पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त डॉ. सचिंद्र प्रताप सिंग यांनी केले.
नाशिक येथील इंडीजिनस फार्म आणि आर्मर हेलिक्स इंडिया प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार (ता.११) रोजी गीर संवर्धनासाठी ‘आयव्हीएफ’ पद्धतीने ५० देशी गीर कालवड पैदास प्रकल्पाचा शुभारंभ आयुक्त डॉ. सिंग यांच्या हस्ते करण्यात आला. हा प्रकल्प ‘स्टार्टअप इंडिया’ अंतर्गत निवड झालेला व भारतीय पशु चिकित्सा संशोधन संस्था बरेली येथे दोन महिने इंक्युबॅशन प्रोग्राम यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे, प्रादेशिक सहआयुक्त डॉ. बाबुराव नरवाडे, नियोजन विभागाचे उपायुक्त डॉ. शैलेश केंडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे, सहाय्यक आयुक्त डॉ. गिरीश पाटील, डॉ. शहाजी देशमुख, पशुधन विकास अधिकारी डॉ. संदीप पवार, डॉ. सचिन वेंधे, सौ. रिना हिरे आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना सिंग म्हणाले, भारतीय गीर गोवंश देशातून ब्राझीलमध्ये गेला. असे असताना ब्राझीलमधून पुन्हा देशी गोवंशाचे सीमेन्स भारतात आणले. ही बाब कौतुकास्पद आहे. शासनाने ‘आयव्हीएफ’ व ‘ईटीटी’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसोबत काम केले होते. मात्र ते खर्चिक होते. आता केंद्राने योजना आणून अनुदानाच्या माध्यमातून खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. अशाच पध्द्तीने राहुल खैरनार यांनी अभ्यासपूर्ण हाती घेतलेले प्रयोग युवकांसाठी आदर्श असल्याची कौतुकाची थाप त्यांनी यावेळी दिली.
डॉ. धनंजय परकाळे यावेळी बोलताना म्हणाले, नाविन्यपूर्ण पद्धतीचा अभ्यास करून तंत्रज्ञानाचा फायदा शेतकऱ्याला होणे महत्वाचे असते.एरवी तंत्रज्ञान कधीच विकसित झालेले असते. मात्र त्याचा प्रसार होत नाही. त्यासाठी आता यासाठी राज्य सरकार याबाबत योग्य ती पावले उचलत आहे.त्यामुळे स्वस्तात शेतकऱ्यांच्या दारात जातिवंत कालवडी तयार होतील, याची आशा वाटते. नुसते शासन एकटे काही करू शकत नाही.शेतकऱ्यांचा सहभाग यात महत्वाचा आहे. त्याअनुषंगाने नवीन उद्योजक तयार व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. संतोष साबळे यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी संचालक राहुल खैरनार आणि आर्मर हेलिक्स इंडियाच्या संचालिका सौ. रीना हिरे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.