सांगली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इन्स्टाग्रामर गौतमी पाटीलच्या मिरज तालुक्यातील बेडग येथे लावणी कार्यक्रमात प्रेक्षक बेधुंद झाले. कार्यक्रमाला चाहत्यांची इतकी गर्दी जमली की मैदान कमी पडले. त्यामुळे काही बेधुंद प्रेक्षक जिल्हा परिषद शाळेच्या कौलारु छतावर जाऊन ठेका धरु लागले. यामुळे जिल्हा परिषद शाळेच्या छताचा चुराडा तर झाडावर प्रेक्षक बसल्याने अनेक झाडे देखील मोडली. शाळेच्या झालेल्या या नुकसानीला कोण जबाबदार असा सवाल आता ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे.
गौतमी ही २६ वर्षीय असून कोल्हापूरची असली असे सांगितले जात असले तरी, मी मुळची धुळे जिल्ह्यातील आहे. धुळ्यातील सिंदखेडा या ठिकाणीच दहावीपर्यंत शिक्षण घेतले आहे, असे तिने सांगितले आहे. गेली नऊ ते दहा वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करत आहे. डान्ससाठी कुठे प्रशिक्षण घेतलेले नाही. इतरांचे पाहून मी डान्स करायला शिकले. गौतमी पाटीलचे डान्स व्हिडीओ युट्युब, इंस्टाग्राम, फेसबुक वर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. गौतमीच्या या व्हिडीओची चर्चा होते. मात्र, काही व्हिडिओमधील डान्स स्टेप्समुळे गौतमी वादाच्या भोवऱ्यात अडकली होती.
बेडग इथल्या एका मंडळाच्या वतीने वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या आणि बेडग गावचे नाव सर्वत्र गाजवणार्या मानकऱ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, त्यानंतर सोशल मीडिया स्टार गौतमी पाटील हिच्या नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. नृत्याचा कार्यक्रम सुरु झाला. तिचे नृत्य पाहण्यासाठी जिल्ह्यातून आणि बाहेरुन तिचे चाहते आले होते. कार्यक्रमाच्या वेळी शाळेच्या पटांगणात तुफान गर्दी झाल्याने ही दुर्घटना घडली.
काही दिवसांपूर्वी व्हिडीओमधील डान्स स्टेप्समुळे गौतमी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. सार्वजनिक कार्यक्रमात डान्स करताना गौतमीने आक्षेपार्ह डान्स स्टेप्स केल्याने माफी मागावी लागली होती. तिला एका वादग्रस्त इशाऱ्यामुळे अनेकांच्या टीकांना सामोरे जावे लागले होते. तिचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. तिने सार्वजनिक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वेळी गाण्यावर विचित्र हावभाव करून, अंगावर पाणी ओतून नाचताना दिसत होती. यावर सर्व क्षेत्रातून तीव्र शब्दात प्रतिक्रियी आल्या होत्या. तसेच लावणी साम्राज्ञी सुरेखा पुणेकर आणि अन्य लावणी नृत्यांगणा यांनी तिच्या या कृत्याबद्दल जाब विचारला होता.
Gautami Patil Lavani Dance School and tree Damage