नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशातील मोठे उद्योगपती आणि श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळालेले उद्योगपती गौतम अदानी आणि त्यांच्या पत्नी डॉ. प्रीती अदानी सध्या चर्चेत आले आहेत. अदानी दाम्पत्यामधील एकाला राज्यसभेचे तिकीट मिळणार असल्याची जोरदार चर्चा रंगलेली आहे. मात्र यासंदर्भातील वृत्त अदानी ग्रुपने फेटाळून लावले आहे.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या फोर्ब्सच्या यादीत गौतम अदानी यांनी पाचवे स्थान मिळविले आहे. त्यांची मालमत्ता १२३.१ अब्ज डॉलर्स असून, त्यांनी वॉरेन बफेट यांना मागे टाकले आहे. बफेट यांची मालमत्ता १२१.अब्ज डॉलर्स इतकी आहे. देशातील विविध क्षेत्रात अदानी यांनी गुंतवणूक केली आहे. मोदी सरकारकडून त्यांना सवलत दिली जात असल्याचाही आरोप करण्यात येतो. त्यांना राज्यसभेचे तिकीट दिले जाऊ शकते अशी चर्चा सुरू झाल्याने त्यावर अदानी ग्रुपने स्पष्टीकरण दिले आहे.
अदानी ग्रपुने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, गेल्या काही दिवसांपासून गौतम अदानी आणि त्यांच्या पत्नी प्रीती अदानी यांना राज्यसभेवर पाठवले जाण्याचे वृत्त माध्यमांमध्ये येत आहे. अनेक जण स्वतःच्या फायद्यासाठी आमचे नाव मलीन करत आहे. हे वृत्त पूर्णपणे चुकीचे आहे. गौतम अदानी आणि डॉ. प्रीती अदानी यांच्यासह कुटुंबातील कोणताही सदस्य कुठल्याही पक्षात प्रवेश करणार नाही. हे वृत्त चुकीचे आहे.
१९८८ साली अदानी यांनी उद्योग क्षेत्रात पाऊल ठेवले होते. त्यांनी अदानी एक्स्पोर्ट्स नावाची पहिली कंपनी स्थापन केली होती. पाच लाखांच्या भागभांडवलावर सुरू केलेली कंपनी नंतर अदानी एंटरप्रायजेस नावारूपाला आली. अदानी लिमिटेड कंपनी १९९४ साली शेअर बाजारात उतरली होती.