नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हिंडेनबर्गचा अहवाल पुढे आल्यापासून गौतम अदानींच्या मागचे ग्रहण काही सुटत नाहीये. सातत्याने कुठल्या ना कुठल्या अडचणींचा सामना अदानी समूहाला करावा लागत आहे. आता तर अदानींना एका विषयात झुकते माप दिल्यामुळे बाजार नियंत्रक सेबीच अडचणीत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गौतम अदानी यांचा जगातील सर्वांत श्रीमंत लोकांच्या यादीतील क्रमांक खाली घसरला. एका व्यवसायात चांगली स्थिती आली की दुसरीकडून अडचण निर्माण होत आहे. त्यात राहुल गांधी आणि इंडिया आघाडीतील लोक त्यांच्या मागे हात धुवून लागलेलेच आहेत. अशात ‘सेबी’ने अदानी समूहाच्या २०१४ मधील कथित समभाग व्यवहारातील लबाडीबद्दल महसूल गुप्तचर संचालनालयाचे पुराव्यांसह इशारा देणारे पत्र दडपले आणि हे अत्यंत महत्त्वाचे तथ्य सर्वोच्च न्यायालयापुढे अद्याप उघड केलेले नाही, असा आरोप अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाशी निगडित जनहित याचिकाकर्त्यांपैकी एकाने केला आहे.
सेबी आणि अदानींमध्ये हितसंबंध गुंतले असल्याचा आरोप प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे. डीआयआरने पुराव्यासह आरोप करणारे पत्र ज्यांना दिले ते तत्कालीन सेबीप्रमुख एनडीटीव्हीच्या संचालक मंडळात आहेत. ‘इनसाइडर ट्रेडिंग’सारख्या गुन्ह्यांकडे लक्ष देणाऱ्या सेबीच्या उपसमितीचे सदस्य सिरिल अमरचंद मंगलदास (सीएएम) या विधी सेवा कंपनीचे प्रमुख सिरिल श्रॉफ यांच्या मुलीचा विवाह गौतम अदानी यांचा मुलगा करण याच्याशी झाल्याचेही प्रतिज्ञापत्रात दाखवून देण्यात आले आहे. ही नात्यांमधील गुंतागुंत आरोपांमध्ये तथ्य असल्याकडे निर्देश करते, असे बोलले जात आहे.
प्रतिज्ञापत्राद्वारे दावा
सर्वोच्च न्यायालयापुढे अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणी चौकशीची मागणी करणाऱ्या एड. अनामिका जयस्वाल यांची देखील जनहित याचिका प्रलंबित आहे. त्यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. ‘सेबी’चे तत्कालीन अध्यक्ष यू. के. सिन्हा यांनी २०१४ मध्ये अदानी समूहाविरुद्ध महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) इशाऱ्यावर कारवाई केली नाही. उलट त्यांनी तपासच बंद केला. आता सिन्हा हे अदानी समूहाने विकत घेतलेल्या एनडीटीव्ही या कंपनीचे स्वतंत्र संचालक आणि अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
Gautam Adani SEBI Supreme Court Petitioner Fraud Transaction