मुंबई – भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (सेबी) या शेअर बाजाराचे नियमन करणार्या संस्थेने अदानी विल्मर लिमिटेडला मोठा झटका दिला आहे. गौतम अदानी समुहाच्या या कंपनीच्या आयपीओला (इनिशिअल पब्लिक ऑफरिंग) सेबीने रोखले आहे.
सेबीने संकेतस्थळावर सांगितले की, अदानी विल्मरच्या ड्राफ्ट प्रॉस्पेक्टसवर टप्पणी रोखण्यात आल्या आहेत. ड्राफ्ट प्रॉस्पेक्टससाठी सेबीकडून टिप्पणी देण्यात येते, त्यानुसार आयपीओला मंजुरी मिळाली आहे असे मानले जाते. त्यानंतर कंपन्या आयपीओला आणू शकतात.
आम्ही नेहमीच नियमांचे पालन केले
याबाबत अदानी समुहाकडून प्रतिक्रिया आली आहे. आयपीओ स्थगित करण्यासंदर्भात सेबीने त्यांच्या संकेतस्थळावर माहिती दिली असली तरी, आम्हाला अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही, असे अदानी समुहाच्या प्रवक्त्यांनी सांगितले. आम्ही सेबीच्या नियमांचे नेहमीच पालन केले आहे. नियामक संस्थेने आधी मागितलेली सर्व माहिती आम्ही उपलब्ध करून दिली आहे. भविष्यातही आम्ही सर्व नियमांचे पालन करून सहकार्य करू, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
एफपीआयशी संबंध नाही
अदानी समुहाच्या प्रवक्त्यांनी परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार म्हणजेच एफपीआयबाबतही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, अदानी ग्रुपचे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रूपाने एफपीआयशी काहीही संबंध नाही. दुर्दैवाने या मुद्द्याला वेळोवेळी उपस्थित करून गुंतवणूकदारांची दिशाभूल केली जात आहे.
चौकशी सुरू
जुलै महिन्यात केंद्र सरकारमधील मंत्री पंकज चौधरी यांनी संसदेला सांगितले, की प्रतिभूती नियामक आणि सीमा शुल्क प्राधिकरण नियमांचे पालन करण्यासाठी अदानी समुहाच्या काही कंपन्यांची चौकशी सुरू आहे. चौधरी यांनी चौकशीसंदर्भात सविस्तर माहिती दिली नव्हती. अदानी विल्मरच्या आयपीओला रोखल्याने चौकशी सुरू असल्याचे बोलले जात आहे. सेबीने यासंदर्भात अद्याप स्पष्टीकरण दिले नाही.
४५०० कोटी रुपये जमविण्याची योजना
तेल कंपनी अडानी विल्मर लिमिटेडने आयपीओच्या माध्यमातून ४५०० कोटी रुपये जमविण्यासाठी सेबीकडे कागदपत्रे जमा केली होती. अदानी समुहाच्या नव्या कंपन्यांचे सयंत्रे तसेच नव्या कारखान्यांसाठी लागणार्या खर्चांसाठी या पैशांचा उपयोग केला जाणार आहे. त्याशिवाय कर्ज फेडणे, रणनीतीक संपादन आणि गुंतवणुकीशिवाय सामान्य कपंन्यांच्या कामांमध्ये या पैशांचा वापर करण्याची कंपनीची इच्छा आहे.
रामदेव यांच्या कंपनीशी स्पर्धा
अदानी विल्मर कंपनी फॉर्च्युन ब्रँडअंतर्गत खाद्यतेलाची विक्री करते. योगगुरू बाबा रामदेव यांच्या रूची सोया या तेलाच्या ब्रँडकडून फॉर्च्युनला व्यवसायात आव्हान मिळत आहे. २०१९ मध्ये रूची सोया विकत घेण्यासाठी पतंजली आणि अदानी समुहात स्पर्धा निर्माण झाली होती. त्यानंतर अदानी विल्मरने रूची सोयाच्या दावेदारीतून माघार घेतली होती. त्यानंतर रूची सोयाला बाबा रामदेव यांच्या पतंजली समुहाने विकत घेतले होते.