इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गौतम अदानी यांचा अदानी समूह आता सौदी अरेबियामध्येही आपले पाय रोवत आहे. यासाठी अदानी समूहाने सौदी अरामकोशी बोलणी केली आहे. सौदी आरामको ही तेल, पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस कंपनी आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, अदानी समूह जगातील या सर्वात मोठी तेल निर्यातक अरामकोमध्ये भागभांडवल विकत घेण्याच्या तयारीत आहेत.
मुकेश अंबानींच्या रिलायन्स आणि आरामको यांच्यातही करार झाला होता. मात्र, रिलायन्सने नंतर प्रस्तावित १५ बिलियन डॉलरचे पुनर्मूल्यांकन जाहीर केले. दोन वर्ष रिलायन्स आणि अरामकोमध्ये चर्चा झाली होती. परंतु, गेल्या नोव्हेंबरमध्ये या दोन्ही कंपन्यांची चर्चा फिसकटली आणि व्यवहार झाला नाही. त्यामुळे अदानी समूह या व्यवहारात उतरला आहे.
अदानी समूहाने सौदी अरामको आणि देशाच्या सार्वजनिक गुंतवणूक निधी (पीआयएफ) सोबत संभाव्य सहकार्य आणि संयुक्त गुंतवणुकीच्या संधींबाबत प्राथमिक स्तरावर चर्चा केली आहे. PIF च्या अरामकोमधील भागभांडवल विकत घेण्याच्या विचारावरही चर्चा झाली आहे. यावर अदानी समूहाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. शिवाय, अदानी अरामकोच्या स्टॉकसाठी अब्जावधी डॉलर्स रोख खर्च करण्याची शक्यता नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे ते सहभागी भागीदार शोधणार आहेत. अल्पावधीतच ते गुंतवणुकीला विस्तीर्ण टाय-अप किंवा मालमत्ता स्वॅप डीलशी जोडण्याचा प्रयत्न करण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. अदानी आणि अरामकोचा हा व्यवहार यशस्वी झाला तर, अदानी अरामकोच्या उपकंपन्यांमध्येही प्रवेश करु शकेल. रिन्यूएबल एनर्जी, क्रॉप न्युट्रिएंट्स आणि केमिकल्ससारख्या क्षेत्रात अरामकोच्या कंपन्या कार्यरत आहेत. हा व्यवहार अरामकोसाठीदेखील अत्यंत फायदेशीर आहे.
ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार, गौतम अदानी जगातील श्रीमंतांच्या यादीत अकराव्या क्रमांकावर आहेत. गौतम अदानी यांची संपत्ती ३.१९ अब्ज डॉलरने वाढून ९०.५ अब्ज डॉलर झाली आहे. अदानी हे आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत अब्जाधीश आहेत.