इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलीवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान हा नेहमीच चर्चेत असतो. स्टारडम असलेल्या या कलाकारांच्या कुटुंबीयांची देखील नेहमीच चर्चा असते. ड्रग्ज प्रकरणी जवळपास वर्षभरापूर्वी शाहरुखचा मुलगा आर्यन खान चर्चेत होता. शाहरुखची पत्नी गौरी खानही नेहमी चर्चेत असते. चार वर्षांच्या ब्रेकनंतर शाहरुख ‘पठाण’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. ‘पठाण’नंतर शाहरुख ‘डंकी’ व ‘जवान’ या चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे.
बॉलिवूड किंग शाहरुख खान प्रेक्षकांमध्ये फारच लोकप्रिय आहे. शाहरुखबरोबर त्याची पत्नी गौरी खानही चर्चेत असते. शाहरुख आणि गौरीकडे बॉलीवूडमधील आदर्श जोडपं म्हणून पाहिलं जातं. शाहरुखचे पत्नी गौरीवर किती प्रेम आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. अशाच एका मुलाखतीत गौरीने स्वतःच शाहरुख तिच्याबाबत पझेसिव्ह असल्याचं सांगितलं आहे.
सिमी गरेवाल यांच्या चॅट शोमध्ये गौरीने नुकतीच हजेरी लावली होती. या मुलाखतीत शाहरुखबाबतच्या अनेक गोष्टींचा खुलासा गौरीने केला. “शाहरुख सुरुवातीला माझ्याबाबतीत इतका पझेसिव्ह होता की तो आजारी आहे, असं मला वाटायचं. मी काय घालावं, कोणत्या रंगाचे कपडे घालावेत, कशा पद्धतीचे कपडे घालावेत याच्या सूचना तो मला द्यायचा, असे गौरीने यावेळी सांगितले. मी पांढऱ्या रंगाचे कपडे घालण्यावरही त्याचा आक्षेप होता. त्यासाठी, पांढरे कपडे ते ट्रान्सपरंट असल्याचं कारण त्याने मला दिलं होतं”, असं गौरीने सांगितलं. याबरोबरच शाहरुख गुडघ्यांवर असलेले कपडेही घालू देत नसल्याचा खुलासा गौरीने केला होता.
शाहरुखनेही गौरीच्या या वक्तव्याला दुजोरा दिला आहे. “मी गौरीबाबत खूपच पझेसिव्ह होतो. तिला कोणाबरोबर बोलताना बघितलं तरी मला वाईट वाटायचं. महिला असो की पुरुष, आपल्या जोडीदाराबद्दल ही भावना प्रत्येकाच्या मनात असते”, असं शाहरुख म्हणाला होता. शाहरुखच्या या ओव्हर पझेसिव्हनेसमुळे गौरीला मनस्ताप झाला. आणि तिने त्याच्यासोबतचं नातंच संपवून टाकलं होतं. मात्र, शाहरुखने समजूत काढल्यानंतर पुन्हा ते दोघं एकत्र आले.
Gauri Khan on Husband Shahrukh Khan