नवी दिल्ली – घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर फक्त ६३३.५० रुपयांमध्ये मिळत आहे, हे ऐकून तुम्ही दचकला तर नाही ना? घरगुती सिलिंडरच्या दरांमध्ये सध्या कोणताही बदल झालेला नाही. ४ ऑक्टोबरनंतर सिलिंडर स्वस्तही झाले नाही अन् महागही झाले नाही. मग ते तुम्हाला ६३३.५० रुपयांमध्ये कसे मिळेल? हा प्रश्न निर्माण झाला असेल.
आम्ही तुम्हाला कंपोजिट सिलिंडरबद्दल सांगत आहोत. त्यामध्ये गॅस दिसेल आणि १४.२ किलो गॅस असलेल्या जड सिलिंडरपेक्षाही ते हलके असेल. १४.२ किलो गॅस सिलिंडर दिल्लीत सध्या ८९९.५० रुपयांना मिळत आहे. परंतु कंपोजिट सिलिंडर फक्त ५०२ रुपयांमध्ये रिफील होणार आहे.
काय आहेत वैशिष्ट्ये?
सहा दशकांच्या प्रवासानंतर गॅस कंपन्यांनी घरगुती सिलिंडरमध्ये बदल केले आहेत. बाजारात उपलब्ध असलेला कंपोजिट सिलिंडर लोखंडी सिलिंडरच्या तुलनेत ७ किलो हलका आहे. त्यामध्ये तीन थर आहेत. सध्या वापरात असलेले रिकामे सिलिंडर १७ किलोचे असते. गॅस भरल्यानंतर ते ३१ किलोपेक्षा अधिक जास्त वजनाचे होते. दहा किलोच्या कंपोजिट सिलिंडरमध्ये दहा किलो गॅस असतो.
या शहरांमध्ये मिळणार
एलपीजीचे दर कमी झालेले नाहीत. कंपोजिट सिलिंडरमध्ये सध्याच्या सिलिंडरच्या तुलनेत ४ किलो गॅस कमी असेल. कंपोजिट सिलिंडर पहिल्या टप्प्यात दिल्ली, वाराणसी, प्रयागराज, फरिदाबाद, गुरुग्राम, जयपूर, हैदराबाद, जालंधर, जमशेदपूर, पाटणा, म्हैसूर, लुधियाना, रायपूर, रांची, अहमदाबादसह २८ शहरांमध्ये उपलब्ध आहे.