नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात घरगुती गॅसचा वाहनांसाठी राजरोस वापर होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ व युनिट २ पथकांनी दोन अड्डे उध्वस्त केले आहेत. त्यात खडकाळी आणि श्रमिकनगर येथील अड्याचा समावेश असून या कारवाईत तीघांना बेड्या ठोकत पथकांनी दीड लाखाहून अधिक मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी भद्रकाली आणि सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार खडकाळी सिग्नल भागात पैसे घेवून घरगुती सिलेंडरमधून वाहनांना गॅस भरून दिला जात असल्याची माहिती युनिट १ पथकास मिळाली होती. त्यानुसार गुरूवारी (दि.३) सायंकाळी पथकाने छापा टाकला असता परिसरातील मोकळय़ा पटांगणातील पत्र्याच्या शेडमध्ये एजाज चांद शेख (२३ रा.नाईकवाडीपुरा,भद्रकाली ) हा घरगुती सिलेंडर मधून रिकाम्या गॅस सिलेंडर मध्ये मोटार असलेल्या मशिनच्या सहाय्याने गॅस भरतांना मिळून आला. संशयितास बेड्या ठोकत पथकाने या ठिकाणाहून भरलेल्या सहा व रिकाम्या चार टाक्या तसेच इलेक्ट्रीक पिस्टन व इलेक्ट्रीक मोटार असलेले मशिन,वजन काटा असा सुमारे ४६ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी अंमलदार आप्पा पानवळ यांच्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सत्यवान पवार करीत आहेत.
दुसरी कारवाई औद्योगीक वसाहतीतील श्रमिकनगर भागात करण्यात आली. पार्थ हॉटेलच्या पाठीमागील नाल्याजवळ गॅस भरून देण्याचा अड्डा सुरू असल्याची माहिती युनिट २ च्या पथकास मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठांच्या आदेशान्वये गुरूवारी (दि.३) सायंकाळी पथकाने माळी कॉलनी भागात छापा टाकला असता रामेश्वर नागरे यांच्या प्लॉट मधील पत्र्याच्या शेडमध्ये संजय रामराव शेळके (५४ रा.नागरे चौक,श्रमिकनगर) व छोटू गोरख शिरसाठ (३९ रा.श्रमिकनगर) हे दोघे या ठिकाणी बेकायदा घरगुती सिलेंडरमधील गॅस खासगी वाहनात भरतांना मिळून आले. संशयितांच्या ताब्यातून गॅस भरण्याचे वेगवेगळया कंपनीचे मशिन, सिलेंटरच्या टाक्या व रोकड असा सुमारे १ लाख ८ हजार ५२० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याबाबत हवालदार संजय सानप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार खरपडे करीत आहेत.