नाशिक – ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटन समारंभात ‘गर्जा जय जयकार क्रांतीचा’ हा दर्जेदार कार्यक्रम सादर होणार आहे. आज दुपारी हा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरणार आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या ‘गर्जा जय जयकार क्रांतीचा’ या स्वातंत्र्यसंग्रामातील लोकप्रिय कवितेचे स्वर यावेळी गुंजणार आहेत. आज दुपारी संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ही कविता ४० युवा कलावंत सादर करणार आहेत.
कुसुमाग्रज प्रतिष्ठानने या गीताची जबाबदारी घेतली असून गायक- संगीतकार मकरंद हिंगणे यांनी या गीताला स्वरमय केले आहे. प्रसिद्ध युवा कलावंत आशिष रानडे, ज्ञानेश्वर कासार, आनंद अत्रे , पुष्कराज भागवत, हर्षद वडजे, जाई कुलकर्णी आणि त्यांचे विद्यार्थी या गीताचे गायन करणार आहेत.
१९४२ च्या नाशिक संमेलनात कुसुमाग्रज यांनी सादर केलेल्या या कवितेस फार मोठा प्रतिसाद मिळाला होता, याच संदर्भात नाशिक मधील साहित्य रसिकांकडून हे गीत उद्घाटनाच्या वेळी सादर केले जावे अशी मागणी होत होती. गीतासाठी तांत्रिक सहाय्य फिदरटच स्टुडिओचे श्री. शुभम जोशी यांनी केले आहे