इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भाद्रपद महिन्यात चतुर्थीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. सर्वत्र हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी भाविक आपल्या लाडक्या गणरायाची अर्थात बाप्पाची मूर्ती घरी आणून विधीपूर्वक स्थापना करतात आणि श्री गणेशाची मनोभावे पूजा करतात. फक्त भारतातच नाही तर विदेशातही गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळते. देश-विदेशात गणेशभक्तांसाठी हा महत्त्वाचा सण आहे. घरगुती गणेशाची स्थापना २७ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे ४.५० ते दुपारी १.५३ पर्यंत कधीही करता येईल.
अशी करा पूजा आणि श्रीगणेशाची स्थापना
गणपतीची स्थापना करण्याकरिता चौरंग किंवा पाट आणि सभोवती मखर. पूजास्थानाच्या वर बांधण्याकरता नारळ , आंब्यांचे डहाळी , सुपाऱ्या. पाण्याने भरलेला तांब्या, पळी , पंचपात्र, ताम्हण, समई, जानवे, पत्री, शेंदूर, विड्याची पाने, सुपाऱ्या, नारळ, फळे, प्रसादाकरिता मोदक, मिठाई, पेढे, गोड पदार्थ असे पूजा साहित्य घेऊन पूजेची पूर्वतयारी करावी.
गणेश चतुर्थी दिनी प्रात:स्नान-संध्या पूजादी नित्यविधी करावेत.
मूर्ती ठेवण्याची जागा स्वच्छ सारवून त्यावर रंगीत पाट मांडून,( तांदुळ)अक्षता पसराव्यात. यानंतर त्यावर मूर्ती स्थापन करावी व शूचिर्भूतपणे आसनावर बसवून द्विराचमन (दोनदा पाणी पिणे), प्राणायाम आदी केल्यावर ‘श्रीपरमेश्वप्रीत्यर्थ भाद्रपदमासे शुद्ध पक्षे श्री पाथिर्वगणपतिपूजनमहं करिष्ये’ असा संकल्प म्हणून पाणी सोडावं. कलश, शंख, घंटा व निरांजन,मोठी समई दीप यांचे पूजन करून शेंदूर, गंध, अक्षता, पुष्प अर्पण करावं.
गणपतीच्या नेत्रांना हिरव्या ताज्या दुर्वांनी शुद्ध तुपाचा स्पर्श करावा व मूर्तीच्या हृदयाला आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याने स्पर्श करून प्राणप्रतिष्ठा करावी.