मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – अभिनेत्री आलिया भट्टचा बहुप्रतिक्षित चित्रपट गंगूबाई काठियावाडी या आठवड्यात थिएटरमध्ये दाखल होणार आहे. रिलीजच्या काही दिवस आधी हा चित्रपट कायदेशीर अडचणीत अडकला. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हा चित्रपट गंगूबाई या वास्तविक जीवनातील पात्रावर आधारित आहे, एकेकाळी ती मुंबईच्या कामाठीपुरामध्ये राहत होती. या चित्रपटाच्या कथेबाबत नुकतेच गंगूबाई काठियावाडी कुटुंबीयांनीही आवाज उठवला होता. आता कामाठीपुरा येथे राहणारे नागरिकही याविरोधात बोलत आहेत.
चित्रपटात कामाठीपुराचे नाव चुकीचे दाखवण्यात आल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. सदर मागणी पाहून स्थानिक आमदार अमीन पटेल यांनी याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. चित्रपटातील कामाठीपुराचे नाव बदलण्यात यावे, अशी मागणी त्यांच्या बाजूने करण्यात आली आहे. मात्र, न्यायालयाने चित्रपट प्रदर्शन रोखण्याची मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हा चित्रपट उद्या म्हणजे २५ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
याबाबत कामाठीपुरा परिसरातील नागरिकांच्या तक्रारी आहेत की, प्रत्यक्षात आपल्या परिसराला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कामाठीपुरा हा भाग काही वर्षांपूर्वी मुंबईतील रेड लाईट एरिया म्हणून कुप्रसिद्ध होता. पुढे कामठी – कामगार येथे कुटुंबासह रहायला लागले. आलिया भट्टच्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाचा ट्रेलर आल्यापासून कामाठीपुराचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे आणि काही जण अजूनही याकडे रेड लाइट एरिया म्हणून पाहत आहेत. अशा परिस्थितीत जाणूनबुजून आपल्या परिसराची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळेच या चित्रपटाच्या प्रदर्शनावर तूर्तास बंदी घालण्याची मागणी येथील नागरिक करत आहेत. सध्या आलिया भट्ट या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकतीच ती गंगूबाई काठियावाडीच्या प्रमोशनसाठी बर्लिनलाही पोहोचली होती.
बघा, या चित्रपटाचा ट्रेलर
एका मुलाखतीदरम्यान आलिया भट्टने खुलासा केला आहे की, संजय लीला भन्साळी परिपूर्ण शॉट मिळेपर्यंत कठोर परिश्रम करतात. ते सहज कोणाचीही प्रशंसा करत नाहीत. यासोबतच या चित्रपटाच्या माध्यमातून तिला संजय लीला भन्साळी यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले जे तिच्या संपूर्ण आयुष्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. गंगूबाई काठियावाडी या चित्रपटात अजय देवगण, विजय राज आणि शांतुन माहेश्वरी यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.