उत्तरकाशी – जगात प्रसिद्ध असलेल्या गंगोत्री धामचे दरवाजे शनिवारी सकाळी साडेसातला विधीवत पूजा करून उघडण्यात आले. चारधाम यात्रा स्थगित झाल्यामुळे दरवाजे उघडण्याच्या कार्यक्रमाला २१ तीर्थ पुरोहित सहभागी झाले होते.
गंगोत्री धामचे दार उघडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने पहिली पूजा करण्यात आली. कोरोना संसर्गातून मुक्तता होण्याची तसेच देशात सुख-शांतता नांदण्याची प्रार्थना तीर्थ पुरोहितांनी केली. या निमित्त गंगोत्रीमध्ये हिवाळ्यात साधना करणार्या साधू-संतांनी दुरूनच गंगा मातेचे दर्शन घेतले.
शासनाचे प्रतिनिधी म्हणून उपजिल्हाधिकारी देवेंद्र नेगी, गंगोत्री मंदिर समितीचे अध्यक्ष सुरेश सेमवाल, सहसचिव राजेश सेमवाल, गंगा पुरोहित सभेचे अध्यक्ष पवन सेमवाल, राकेश सेमवाल, मंदिर समितीचे सचिव दीपक सेमवाल, सतेंद्र सेमवाल या वेळी उपस्थित होते.
गेल्या शुक्रवारी गंगा मातेची पालखी हिवाळ्यातील प्रवासस्थानाच्या मुखवापासून गंगोत्रीकडे रवाना झाली होती. भैरव खोर्यातील भैरव मंदिर येथे पालखी यात्रेने मुक्काम केला. भैरव मंदिरापासून शनिवारी पहाटे चारला पालखी गंगोत्रीकडे रवाना झाली. सकाळी साडेसहाला गंगोत्री धाम येथे पोहोचली. त्यानंतर गंगा सहस्रनाम पाठ, गंगा लहरी पाठ, गंगा होमहवन आदी पूजा करण्यात आली. दरवाचे उघडल्यानंतर दुसरी पूजा मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांच्या नावाने करण्यात आली.