नाशिक – धरण क्षेत्रात होत असलेल्या जोरदार पावसामुळे गंगापूर धरणातून होणारा विसर्ग वाढविण्यात येणार आङे. त्यामुळेच गोदावरी नदीला महापूर येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांच्याशी चर्चा केली आहे. त्यानुसार, आज दुपारी १२ वाजेपर्यंत गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग होणार आहे. हा विसर्ग तब्बल १५ हजार क्युसेक्स पेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीच्या पाण्यात भरीव वाढ होणार असल्याने SOP प्रमाणे सर्व संबंधित विभागानी योग्य ती कार्यवाही करावी अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. नदी लगतच्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे. अन्य नागरिकांनी नदीजवळ पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये. आजही अतिवृष्टीचा इशारा विचारात घेता नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.