वाराणसी – गंगा नदीत स्नानामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे. गंगा नदीच्या खोर्यात महामारीने घेतलेल्या विक्राळ रूपाने तज्ज्ञांची चिंता वाढली आहे. आगामी १५ दिवसांत गंगा नदीत स्नान न करण्याचे आवाहन गंगा नदी विकास आणि जलसंधारण व्यवस्थापन संशोधन केंद्राचे अध्यक्ष महामना मालवयी आणि नदीचे अभ्यासक बी. डी. त्रिपाठी यांनी केले आहे.
गंगा नदीच्या खोर्यात स्नानापासून भाविकांना परावृत्त करावे, अशा आशयाचे पत्र त्यांनी नमामि गंगे योजनेच्या अधिकार्यांना लिहिले आहे. कोरोना विषाणूवर औषध संपूर्ण जगात आलेले नाही. तसेच गंगेच्या पाण्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता येण्याबाबतचे संशोधन अहवालही पूर्ण झालेला नाही, असे त्रिपाठी यांनी सांगितले आहे.
तज्ज्ञांच्या पथकाकडून संशोधन
प्रा. त्रिपाठी म्हणाले, रुडकी विद्यापीठातील जलस्त्रोत विभागाचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. संदीप शुक्ला यांनीसुद्धा गंगा नदीच्या मार्गात कोरोना संसर्ग होऊ शकतो अशी चिंता व्यक्त केली आहे. १२ वैज्ञानिकांचे पथक नदीच्या वाहत्या पाण्यात विषाणू किती वेळ सक्रिय राहतो याबाबत संशोधन करत आहेत. पाण्यात कोरोना विषाणू किती वेळ सक्रिय राहू शकतो असे संशोधन सुरू असून ते संशोधन पूर्ण झाल्यावर त्याचा खुलासा होऊ शकणार आहे.
४० साधूंना संसर्ग
हरिद्वारच्या कुंभमेळ्यात स्नान केल्यानंतर विविध आखाड्यांमधील जवळपास ४० साधूंना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. महामंडलेश्वर कपिल देव दास यांचा कोरोनामुळेच मृत्यू झालेला आहे. आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी, अन्नपूर्णा मठ मंदिराचे महंत रामेश्वर पुरी रुग्णालयात दाखल आहेत. आतापर्यंत शाही स्नानात ४९,३१,३४३ भाविकांनी स्नान केले आहे. त्यापैकी आतापर्यंत २४८३ कोरोनाबाधित आढळले आहेत.
गंगा नदीचे खोरे
हरिद्वारपासून जवळपास ८०० किमी क्षेत्रातून प्रवास करत गंगा नदी गढमुक्तेश्वर, सोरो, फर्रुखाबाद, कन्नोज, बिठूर, कानपूर, रायबरेली, प्रयागराज, मिर्जापूर, वाराणसी, गाझिपूर, बलिया, बक्सर, पाटणा, भागलपूर मार्गे पुढे जाते.