इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गंगामैय्याची दररोज आरती करणाऱ्या विभू नावाच्या तरुणाने नुकत्याच लागलेल्या नीट परीक्षेत चांगले गुण मिळवित मेडिकलच्या अभ्यासक्रमासाठी स्वत:चे स्थान पक्के केले आहे. गंगामैय्यावर प्रचंड श्रद्धा असलेल्या या तरुणाने मातेच्या आशीवार्दानेच प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्याची भावना त्याने व्यक्त केला आहे. या तरुणाचे नाव विभू उपाध्याय असे आहे.
विभू हा उत्तर प्रदेशमधील बदायू जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो नित्यनेमाने गंगाआरती करतो. रोजचा अभ्यास सांभाळून गंगाआरती करणाऱ्या विभूने नीट परीक्षेत ६२२ गुण मिळविले आहेत. काशी नगरीच्या परंपरेच्या पावलावर पाऊल ठेवत विभू उपाध्याय २०१९ पासून कसबा काचला येथील भगीरथ घाटावर माँ गंगेची संध्याकाळची महाआरती नित्यनियमाने करत आहेत. विभूचे वडील हरेंद्र उपाध्याय कचला शहरातील श्री गंगा आरती सेवा समिती भगीरथ घाटाचे सदस्य आहेत. आपल्या मुलाच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना ते म्हणाले की, २०१९ पासून विभू सतत माँ गंगेची आरती आणि सेवा करत आहेत. तसेच श्री गंगा आरती सेवा समिती भगीरथ घाट काचलाचे संस्थापक सदस्य पंडित किशनचंद्र शर्मा यांना विभू उपाध्याय यांच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, विभूची एमबीबीएसमध्ये झालेली निवड ही सन्मानाची बाब आहे.
गंगामातेची पूजा आणि घरच्यांचा पाठींबा
विभू उपाध्यायची गंगा माताप्रती नितांत श्रद्धा आहे. लक्षणीय बाब म्हणजे आयुष्यभर पवित्र गंगा मातेची आरती करत राहण्याचा मानस असल्याचे विभू सांगतो. इतकेच नाही तर विभूचे कुटुंबदेखील त्यांच्या या श्रद्धाळू स्वभावाबाबत ओळखल्या जाते. गंगा मातेची रोज पूजा आणि घरच्यांच्या पाठिंब्यामुळे हे यश मिळाल्याचे विभू सांगतो.