लखनौ (उत्तर प्रदेश) – सामूहिक बलात्कार प्रकरणी माजी मंत्री गायत्री प्रजापती यांच्यासह तिघांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. न्यायालयाने या तिघांना दोषी ठरवले होते. आज त्यांना शिक्षा ठोठावण्यात आली.
राज्य सरकारमध्ये पूर्वी खाण मंत्री असलेले समाजवादी पक्षाचे गायत्री प्रसाद प्रजापती यांच्यासह तीन आरोपींना विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिली. न्यायाधीश पवन कुमार राय यांनी या तिघांना सामूहिक बलात्कार आणि पोस्को कायद्याच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवले होते. शिक्षेच्या प्रश्नावर सुनावणीसाठी न्यायालयाने सर्व आरोपींना १२ नोव्हेंबरला हजर राहण्याचे समन्स बजावले होते.
न्यायालयाने अमरेंद्र सिंग उर्फ पिंटू सिंग, विकास वर्मा, चंद्रपाल आणि रुपेश्वर उर्फ रूपेश यांना संशयाचा फायदा देत निर्दोष मुक्त केले. पोलिसांनी या सर्व आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. तर आरोपी गायत्री प्रसाद प्रजापती, अशोक तिवारी, अमरेंद्र सिंग उर्फ पिंटू सिंग, विकास वर्मा, चंद्रपाल रुपेश्वर उर्फ रुपेश आणि आशिष कुमार हे या प्रकरणी अहवाल दाखल झाल्यापासून तुरुंगात आहेत.
काय होते प्रकरण
याप्रकरणी चित्रकूट येथील एका महिलेने १८ फेब्रुवारी २०१७ रोजी लखनौतील गौतम पल्ली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सर्व आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि तिच्या अल्पवयीन मुलीचाही विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अहवालात करण्यात आला. त्यानंतर विशेष न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्यावर न्यायालयाने अहवाल दाखल करण्याचे आदेश दिले.
साक्षी, दोषी आणि पुराव्यांची जंत्री
या खटल्या दरम्यान १७ फिर्यादी साक्षीदार आणि ११ दोषी पुरावे फिर्यादीने सादर केले. न्यायालयाने २ नोव्हेंबर २०२१ रोजी सर्व आरोपींचे जबाब नोंदवले. तर ८ नोव्हेंबर रोजी, फिर्यादी आणि बचाव पक्षाच्या वतीने अंतिम युक्तिवाद ऐकल्यानंतर, न्यायालयाने माजी मंत्री गायत्री, अशोक तिवारी आणि आशिष यांना दोषी ठरवण्यात आले. तर पिंटू, विकास वर्मा, चंद्रपाल आणि रुपेश या ५ जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.
https://twitter.com/ANINewsUP/status/1459171084083683346