इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मुंबईतील साकीनाका बलात्कारप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर आता आणखी एका प्रकरणी आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी 12 दोषींना झारखंडच्या सरायकेला-खरस्वान न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
सन 2019 च्या या प्रकरणात, विशेष पॉक्सो न्यायालयाचे न्यायाधीश अमित शेखर यांनी त्यांना विविध कलमांखाली दोषी ठरवले. तसेच, शेवटच्या श्वासापर्यंत तुरुंगात राहण्याची शिक्षा सुनावली. यासोबतच या सर्वांना वीस-वीस हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. तसे न केल्यास दोन वर्षांचा अतिरिक्त कारावास भोगावा लागेल. चांदिल पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरनुसार, २८ ऑगस्ट २०१९ रोजी एका निर्जन ठिकाणी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. एफआयआर नोंदवल्यानंतर एका आठवड्यात पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली होती.
दुसऱ्या एका घटनेत मुंबई शहरात ३२ वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिची हत्या केल्यानंतर आठ महिन्यांनी दिंडोशी सत्र न्यायालयाने दि २ जुन रोजी एका ४४ वर्षीय आरोपी मोहन चौहानला दोषी ठरवलं होते. मुंबईतील दिंडोशी सत्र न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. मोहन चौहानला खून, बलात्कार आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्याच्या संबंधित कलमांसह दोषी ठरवण्यात आलं होतं. १० सप्टेंबर २०२१च्या मध्यरात्री साकी नाका येथे महिला जखमी अवस्थेत आढळली होती.