गणेशोत्सव विशेष
तुज नमो
वाईचा ढोल्या गणपती!
सातारा जिल्ह्यातील श्री तीर्थक्षेत्र आणि दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाई येथील कृष्णा नदीच्या तीरावर असणारे ‘ढोल्या गणपती’चे मंदिर हे सर्व आबालवृद्ध गणेशभक्तांचे आवडते स्थान आहे. दररोज हजारो भक्त या मंदिराला भेट देतात. गणपतीच्या भव्य आणि विशाल मुर्तीमुळे या गणपतीला ‘ढोल्या गणपती’ असे परिचित नाव आहे. हे मंदिर गणपतराव भिकाजी रास्ते यांनी कृष्णा नदीच्या नदीपात्रातच बांधले आहे.
सातारा जिल्ह्यातील वाई हे गाव तेथील कृष्णा नदीवरील अनेक घाट आणि मंदिरं यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. प्राचीन काळी विराट नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गावाला दक्षिणेची काशी म्हणून ओळखले जाते. येथील कृष्णा नदीच्या तीरावर असलेले ढोल्या गणपतीचे मंदिर हे सर्व आबालवृद्ध गणेशभक्तांचे आवडते स्थान आहे. दररोज हजारो भक्त या मंदिराला भेट देतात. वाईकरांसाठी तर हा आध्यात्मिक ठेवा आहे.
वाई येथील प्रत्येक घाटावर कृष्णाबाईचा उत्सव साजरा केला जातो. असे सांगतात की, प्रतापगडावर शिवाजी महाराजांच्या भेटीसाठी विजापुराचा सरदार अफझलखान प्रथम याच गावात तळ ठोकून राहिला होता. तेव्हा येथील शेंडे शास्त्री यांनी शिवाजी राजांचा जय होऊ दे, तुझा उत्सव करीन असा नवस केला आणि कृष्णेची प्रार्थना केली. कृष्णा प्रसन्न झाली, अफझलखान मारला गेला आणि कृष्णाबाईचा उत्सव सुरु झाला तो आजतागायत केला जातो.
कृष्णामाईच्या घाटांवर हेमाडपंथी शैलीतील अनेक मंदिरे आहेत. त्यातील महत्वाचे म्हणजे ढोल्या गणपती मंदिर. हे मंदिर १७६२ साली शिलाहार घराण्याचा राजा भोज याने शहराच्या संरक्षक देवता म्हणून बांधले. १० वर्षे या मंदिराचे काम सुरू होते आणि त्यासाठी त्यावेळी दीड लाख रूपये खर्च आला होता. गर्भगृहात अर्धा मीटर उंच चौथऱ्यावर गजाननाची १० फूट उंच आणि ८ फूट रुंदीची डाव्या सोंडेची रेखीव मूर्ती आहे. या महागणपतीची स्थापना वैशाख शु. १३ शके १६९१ ला करण्यात आली.
मूर्तीचे स्वरूप बाळसेदार असल्याने कदाचित त्याला ‘महागणपती’ किंवा’ ”ढोल्या गणपती” असे म्हणत असावे. मूर्ती एकसंध काळ्या दगडात कोरलेली असून, हा दगड कर्नाटकातून आणला आहे. सध्या मूर्तीला भगवा रंग दिला आहे. त्यामुळे मूर्तीचे मूळ रूप दिसत नाही. हा गणपती दोन्ही मांड्या रोवून बसला आहे. प्रसन्न मुद्रेतील गणपतीस यज्ञोपवितासह मोजके अलंकार घातले आहेत. त्यात गळ्यातील हार, बाजूबंद व पायातील तोडे स्पष्ट दिसतात. एकाच दगडातून सलगपणे घडविलेली ही मूर्ती असून, पाहताक्षणी तिची भव्यता जाणवते. गणपतीच्या भव्य आणि विशाल मूर्तीमुळे या गणपतीला महागणपती किंवा ढोल्या गणपती असे म्हणतात हे आपल्याला मनापासून पटते..
मूर्तीच्या मागील प्रभावळ अर्धचंद्राकृती १३ फूट उंच आहे. गर्भगृहाचे छत ही जणू तत्कालीन स्थापत्य शैलीच्या वैभवाची साक्ष देते.. चुना आणि फरशीचा समन्वय साधून वास्तू शास्त्रज्ञांनी छताच्या पाषाणाला खाचा पाडून त्यात दुसऱ्या दगडांना अणकुचीदार टोके करून ती त्यात बसविली आहेत. हे मंदिर गणपतराव भिकाजी रास्ते यांनी कृष्णा नदीच्या नदीपात्रातच बांधले असे मानले जाते. मंदिराचे आवार चौकोनी आहे. वारंवार येणाऱ्या नदीच्या पुरापासून संरक्षण व्हावे म्हणून गर्भगृहाच्या पश्चिमेकडील मागील भिंतीची रचना मधोमध त्रिकोणी आकार देऊन नावेच्या टोकासारखी म्हणजे माशाच्या आकाराची बांधली आहे. त्यामुळे पुराच्या वेळी पाणी दुभंगले जाऊन पाण्याचा दाब कमी होतो आणि मंदिर सुरक्षित राहतं.
मंदिर नदीच्या काठावर एका पीठावर बांधले आहे. त्यावरील खांबावर काही शिल्पे कोरली आहेत. त्यामध्ये हनुमान, काही योगी, पायांमध्ये हत्ती पकडलेले वाघ अशी शिल्पे आहेत. मंदिराच्या प्रवेश दाराच्या ललाटबिंबावर शेषशायी विष्णूचे शिल्प कोरलेले आहे. दाराच्या उंबरठ्यावर कीर्तिमुख कोरले आहे. मंदिराच्या मंडपात टेकून बसण्यासाठी कक्षासने आहेत. मंडपात दगडी स्तंभआहेत. संपूर्ण बांधकाम हे मोठ्या दगडातच केले आहे. गाभार्यात गणपतीची मूर्ती आहे. परंतु त्याचे वाहन उंदीर मात्र त्याच्या समोर नसून बाजूला भिंतीपाशी आहे.
मूळ मंदिराच्या नंतरच्या काळातली नृसिंहाची एक मूर्ती गाभार्यात आहे. तशीच आणखी एक प्राचीन मूर्ती मंदिराच्या अंगणातील देवळीत ठेवलेली दिसते. मंदिराचे शिखर विटांचे आहे. परंपरेने या मंदिराचा सांभाळ साबणे कुटुंबीय करतात. या मंदिराच्या आवारात संन्याशांच्या सहा समाधी आहेत. त्यांची नावे जरी माहित नसली तरी या समाधी संन्याशांच्याच आहेत असे सांगितले जाते.
मंदिरासंबंधी एक मोड़ी कागद साबणे यांच्या दप्तरामध्ये होता. तो डॉ. ग. ह. खरे यांनी वाचला होता. त्यांनी त्यावरून सांगितले की, या मंदिराला खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी वर्षासन लावून दिले होते आणि आम्ही ते पुढे चालवित आहोत असा छत्रपति शाहू महाराजांचा एक आदेश होता. तसेच त्यानंतर इंग्रज सरकारनेही तेच वर्षासन पुढे सुरु ठेवले, असेही कागद विश्वस्तांकडे आहेत. यावरून या मंदिराचे बांधकाम शिवपूर्व काळातील आहे हे स्पष्ट होते.
महागणपतीचे शिखर हे वाईतल्या सर्व मंदिरांत सर्वांत उंच असून, त्याची पायथ्यापासून कळसापर्यंतची उंची २४ मीटर आहे. वाईसह राज्यातल्या भाविकांची या गणपतीवर मोठी श्रद्धा आहे. तुम्ही वाईला गेला नसाल तर कृष्णाकाठच्या या महागणपतीचं दर्शन घेण्यासाठी नक्की जा.
कृष्णेच्या तीरावर वसलेले वाई ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिद्ध आहे. एकेकाळी ते इथल्या वैशिष्ट्यपूर्ण घाटांसाठी आणि मंदिरांसाठीही प्रसिद्ध होते. वाईमध्ये सिद्धेश्वर मंदिरातील श्री सिद्धनाथांची संजीवन समाधी, गंगा रामेश्वर, काशी विश्वनाथ, लक्ष्मी नारायण, चक्रेश्वर, चिमनेश्वर, कुंटेश्वर, काळेश्वर, कृष्ण मंदिर, गणपती, विठ्ठल, दत्त, बहिरोबा, विष्णू, तसेच समर्थ रामदासांनी स्थापन केलेले रोकडोबा हनुमान इत्यादी मंदिर येथे आहेत.
(छायाचित्रं सौजन्य विकिपीडिया)