थक्कं करणारी गणेश रूपं!
‘इंडिया दर्पण डॉट कॉम’ मध्ये गणेशोत्सव विशेष लेखमाला सुरु झाल्या नंतर दोनच दिवसानी आमच्या काही मित्रांनी व्हाट्सअपवर एक पोस्ट पाठवली ती ‘मानवी मुख असलेल्या जगातील एकमेव गणपतीची’ त्यामुळे आज गणेशोत्सव विशेष मध्ये जगातील या एकमेव गणेशाची माहिती सादर करीत आहोत.
मानवी मुख असलेला एकमेव गणपती!
जगभरातील गणपतीच्या प्रत्येक मूर्तीमध्ये गणेशाचे शीर हे गजमुख असलेले पाहायला मिळते. गणपतीच्या हत्तीमुखा व्यतिरिक्त अन्य रुपाची कुणी कल्पनाही करू शकत नाही. मात्र, दक्षिण भारतात गणपतीला गजाचे शीर लावण्यापूर्वी म्हणजे मानवी मस्तक असलेल्या रूपात गणपतीची मूर्ती असलेले मंदिर आहे.
मनुष्याचे मस्तक असलेली ही जगातील एकमेव गणेश मूर्ती असल्याचे मानले जाते. तामिळनाडूमध्ये कुथनूरपासून जवळच असलेल्या तिलतर्पणपुरी येथे हे मंदिर आहे. ‘आदि विनायक’ असे या मंदिराचे नाव आहे. गजमुखी अवतारापूर्वी मानवी रुपात असलेल्या गणपतीच्या मूर्तीमुळे याला आदि गणपती म्हटले जात असावे, असे सांगितले जाते. गणपतीचे मंदिर असलेल्या भागाला तिलतर्पणपुरी असे म्हणतात.
यामागे एक कथा आहे. ही कथा श्रीरामचंद्रांशी निगडीत आहे. या पौराणिक कथेनुसार, प्रभू रामचंद्र हे आपले पिताश्री राजा दशरथ यांचे श्राद्ध आणि पिंडदान करण्यासाठी आले. मात्र, पिंडदान केल्यावर त्या पिंडाच्या जागी किडे दिसू लागले. श्रीरामांनी पुन्हा पिंडदान केले. मात्र, पुन्हा तेथे किडे दिसून लागले. असे अनेकदा घडल्यावर शेवटी श्रीरामचंद्रांनी महादेव शिवशंकराची आराधना केली. महादेवांची आराधना केल्यानंतर महादेव तेथे प्रकट झाले.त्यांनी श्रीरामांना सांगितले की, मंथरावन येथे जाऊन श्राद्ध करावे. महादेवांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार, श्रीरामांनी तत्कालीन मंथरावन येथे जाऊन पिंडदान केले. आश्चर्य म्हणजे श्रीरामांनी ज्या ठिकाणी पिंडदान केले होते, त्या ठिकाणी त्या चार पिंडांची चार शिवलिंगे तयार झाली. आजच्या काळातही ती शिवलिंगे पाहायला मिळतात. हा भाग थेथे मुक्तिश्वर म्हणून ओळखला जातो. अनेक जण पितरांना मुक्ती मिळावी म्हणून तिलतर्पणपुरी येथे जाऊन श्राद्ध करतात. तिलतर्पणपुरी तीर्थाजवळच हे विशेष गणेशमंदिर आहे.
हे जगातील एकमेव मानवी मुख असलेल्या गणेशमूर्तीचे मंदिर आहे. महादेव शिवशंकराने गणेशाचे मानवी शीर भंग करण्यापूर्वीचे हे गणेश रूप आहे, असे मानले जाते. म्हणूनच याला आदि गणेश (आद्य गणेश) किंवा नरमुख गणेश म्हणतात. या गणेशाला चार हात आहेत व त्याचा चेहरा भाऊ कार्तिकस्वामी म्हणजे मुरुगन यांच्यासारखा आहे. हा गणपती आपला उजवा पाय खाली सोडून ध्यानस्थ बसला आहे. या गणेशाची खुद्द अगस्ती ऋषी हे दर संकष्टी चतुर्थीला आराधना करीत असत. या गणेशाची भक्ती केल्याने कुटुंबामधील आई-वडील, नवरा-बायको, मुलेबाळे यांच्यामधील संबंध उत्तम राहून कुटुंबामध्ये सलोखा राहतो. उत्तम प्रगती होते. लहान मुले आणि विद्यार्थी यांची स्मरणशक्ती वाढते, असा येथे येणाऱ्या भक्तांचा विश्वास आहे.
‘या’ मंदिरातील स्वयंभू गणपतीचा आकार दररोज वाढतो!
गणपतीची अनेक प्राचीन मंदिरे जगप्रसिद्ध आहेत. यापैकी एका मंदिरात गणपती बाप्पाच्या स्वयंभू मूर्तीचा आकार नियमितपणे वाढताना दिसतो. नेमके कुठे आहे ते मंदिर? काय आहे यामागील रहस्य? जाणून घेऊया…
भगवान शिवशंकर आणि पार्वतीमातेचा पुत्र म्हणून गणपती गणेशाची त्रिलोकात ख्याती आहे. गणपतीच्या जन्मापासून ते अवतारांपर्यंच्या अनेक कहाण्या आपण ऐकतो, वाचतो. गणपतीच्या प्रतीकांना स्वतःचा असा वेगळा अर्थ आहे. गणेशाच्या या प्रतीकांचे महत्त्वही अनन्य साधारण असेच आहे. मात्र, भारतात असे एक मंदिर आहे, जेथे गणपती बाप्पाची मूर्ती कुणीही स्थापन केलेली नाही ती प्रकट झालेली स्वयंभू मूर्ती आहे. तरी तिचा आकार नियमितपणे वाढत असल्याचे सांगितले जाते.गणपती बाप्पाच्या अनेक प्राचीन मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे.
केरळमधील मधुरवाहिनी नदीच्या किनाऱ्यावर हे मंदिर बांधण्यात आले आहे. गणपती बाप्पाच्या या मंदिराचे नाव ‘मधुर महागणपती’ असे आहे. या मंदिराची निर्मिती १० व्या शतकात करण्यात आली होती, असे सांगितले जाते. सुरुवातीच्या कालावधीत हे मंदिर महादेव शिवशंकरांना समर्पित होते. मात्र, एक दिवस पुजाऱ्यांचा एक लहान मुलगा या मंदिरात आला आणि येथील एका भिंतीवर गणेशाची आकृती कोरली.मंदिराच्या गाभाऱ्यातील एक भिंतीवर काढण्यात आलेल्या गणपतीच्या आकृतीने मूर्तीस्वरुप धारण केले आणि ती हळूहळू वाढू लागली. आता ही आकृती खूप मोठी झाली आहे, असे सांगितले जाते. तेव्हापासून हे मंदिर गणपतीचे रहस्यमय मंदिर म्हणून नावारुपाला आले. या मंदिरातील गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची रेलचेल असते.
मधुर महागणपती मंदिर केरळमधील कासारगोडपासून सुमारे ७ कि.मी. अंतरावर आहे. येथे मोगराल म्हणजेच मधुवाहिनी नदी प्रवाहित आहे. केरळच्या कासारगोडमध्ये असलेल्या १० व्या शतकातील मंदिरातील तलाव औषधीय गुणांनी परिपूर्ण असल्याचे सांगितले जाते. म्हणजे या तलावातील पाण्यात विशेष प्रभावामुळे औषधीय गुणधर्म निर्माण झाल्याची मान्यता आहे. एकदा टीपू सुलतान या मंदिराचा विध्वंस करण्याच्या उद्देशाने या भागावर चाल करून आला होता. मात्र, अचानक काय झाले कुणास ठाऊक, त्याचे विचार एकदम बललले आणि मंदिराचे कोणत्याही प्रकारचे नुकसान न करता तो परत गेला, अशी एक कथा सांगितली जाते.
मधुर महागणपती मंदिरात मुदप्पा नावाचा खास आणि विशेष उत्सव साजरा केला जातो. गणरायाच्या मूर्तीला गोड तांदूळ आणि तुपाचे मिश्रण करून लेपन केले जाते. यालाच मुदप्पा असे म्हणतात. या मंदिरात हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. केवळ केरळ वा देशभरातून नाही, तर जागतिक स्तरावरील पर्यटकही या मंदिराचे वैशिष्ट्य पाहण्यासाठी आवर्जुन येत असतात. भक्तगण मनोकामना पूर्ण करण्यासाठी बाप्पाचरणी साकडे घालतात. या मंदिरातून कधीही, कोणीही रिकाम्या हाताने परत जात नाही, असे म्हणतात.
वाहन म्हणून मूषक का?
गणपतीच्या प्रतीकांमागे विशिष्ट अर्थ दडलेला आहे. गणपती म्हटले की, गजमुख, लंबोदर, शूर्पकर्ण, मोदक, मूषक अशा अनेक गोष्टी पटकन लक्षात येतात. मूषक आणि गणपतीच्या अनेक कथाही आपण ऐकल्या, वाचल्या आणि पाहिल्या आहेत. मात्र, या गोष्टींमागे नेमकी कारणे असल्याचे सांगितले जातात. मूषक दिसला की, अनेकांना ते आवडत नाही. मात्र, महाकाय गणपतीचे वाहन म्हणून मूषकाची निवड कशी झाली? यामागे नेमके काय कारण सांगितले जाते?
मोर आणि मूषक गणपतीचे वाहन म्हणून मूषक प्रसिद्ध आहे. खरे म्हणजे उंदराप्रमाणे मोर हेदेखील गणपतीचे वाहन आहे. पण गणपतीच्या मूर्तीपाशी जशी मूषकाची लहानशी मूर्ती ठेवली जाते. किंबहुना तशी ती ठेवली जाणे, अत्यावश्यक मानले जाते.
मोर हे गणेशाचे वाहन आहे हे लक्षात घेऊन गणपतीला मोरेश्वर, मयुरेश्वर अशी विविध नावेही दिलेली आढळतात. तरीही गणपतीचे मूषक वाहन अधिक प्रसिद्ध आहे. आता एवढासा मूषक त्याच्यावर महाकाय देहाचा लंबोदर गणपती स्वार होणार कसा आणि स्वार झाला तरी गणपतीला पाठीवर घेऊन मूषक धावणार तरी कसा, असा प्रश्न सर्वांसमोर असतो. मात्र, मूषक गणपतीचे वाहन कसे झाले, याबद्दल एक कथाही आढळून येते.
गणपतीचे वाहन मूषक का झाला, त्यांपैकी एक कथा अशी की, क्रौंच नावाचा एक गंधर्व इंद्रसभेत उपस्थित असतांना चुकून त्याचा पाय वामदेवाला लागला. रागावलेल्या वामदेवाने तू मूषक होशील, असा त्याला शाप दिला. त्या शापाप्रमाणे क्रौंच गंधर्व मूषक झाला आणि त्याच रूपात थेट पराशरमुनींच्या आश्रमात दाखल झाला. त्याने आश्रमात जेवढे काही खाण्यासारखे होते, ते सर्व खाऊन टाकले, जे खाण्यासारखे नव्हते ते कुरतडून टाकले. त्याचा हा धुडगूस असह्य होऊन पराशरमुनींनी त्यापासून मुक्तता करावी, अशी श्रीगणेशाला प्रार्थना केली.
पराशरमुनींची प्रार्थना स्वीकार करून प्रत्यक्ष गणराय तेथे प्रकट झाले आणि त्यांनी आपला सर्वसमर्थ, सुप्रसिद्ध पाश मूषकावर टाकला. गणपतीचाच पाश तो, त्यामधून मूषकाची सुटका झाली नाही. मूषक तेवढ्यापुरता गणपतीला शरण आला. प्रसन्न झालेल्या गणपतीने उंदराला वर मागण्यास सांगितले. मात्र, मूषक गर्वाने आंधळे झाले होते. त्यांनी उलट गणपतीलाच सांगितले की, तुला काय हवे असेल तर मला सांग, मी तुझ्यापाशी वर मागणार नाही. उंदराचे हे बोलणे ऐकून गणेशाने मुत्सद्दीपणाने मूषकाला सांगितले की, मी तुझ्याकडे वर मागतो. तू आजपासून माझे वाहन हो. मूषकाला आपल्या गर्विष्ठपणाचा पश्चात्ताप झाला. पण त्याचा उपयोग झाला नाही. गणपतीचे वाहन होण्याशिवाय मूषकाला गत्यंतर उरले नाही. गणपतीच्या प्रचंड देहाचे ओझे पाठीवर बाळगत त्याला सर्वत्र वावरावे लागले.
मूषक हा शेतीचा नाश करणारा आहे. गणपती हा शेतकऱ्यांचा देव मानला जात असल्यामुळे त्याने मूषकाला आपल्या अंकित करून घेतले आहे, असेही एक मत किंवा एक तर्क या विषयात सांगितला जातो. गणपती हा शेतकऱ्यांचा देव आहे, याचे स्पष्टीकरण देताना गणपतीचे शूर्पकर्ण म्हणजे सुपासारखे कान ही शेतकऱ्याची दोन सुपे आहेत आणि गणपतीची सोंड ही भाताच्या लोंब्यांसारखी आहे, असे मानले जाते. गणपती हे सूर्याचेही एक रूप असून, तो दिवसाचा सूर्य म्हणून रात्रीवर आरूढ झाला आहे आणि मूषक हा रात्री सर्वत्र संचार करीत असल्यामुळे रात्ररूपी उंदरावर गणेशरूपी सूर्य आरूढ झाला, असाही एक मतप्रवाह असल्याचे सांगितले जाते.
मूषक हा थोड्याच दिवसात वा कालावधीत फार मोठ्या संख्येने वाढू शकतो. मूषकाच्या जातीची वाढ फार झपाट्याने होते. त्याचप्रमाणे दूर्वेसारखी खूप वाढणारी वनस्पती गणपतीने आपली मानली आणि झपाट्याने संख्या वाढविणाऱ्या मूषकाला त्याने आपले वाहन केले, असेही सांगितले जाते. मूषक प्रत्येक गोष्ट कुरतडून पाहतो. तेव्हा ती गोष्ट कामाची आहे वा नाही, ते तपासून पाहतो. समाजात प्रत्येक गोष्टीवर टीका करणाऱ्या अनेक वृत्ती आपणास दिसतात. अशा प्रवृत्तीवर नियंत्रणासाठी मूषक. म्हणजेच विवेकाचा अविवेकावर विजयाचे द्योतक आहे, असे मानले जाते.
(छायाचित्र सौजन्य विकिपीडिया)