गणेशोत्सव विशेष…
तुज नमो…
श्रीमंत दगडू शेठ हलवाई गणपती
गणेशोत्सव किंवा गणपती हे शब्द उच्चारल्या बरोबर पहिलं नाव आठवते ते पुण्यातील श्रीमंत दगडू शेट हलवाई गणपतीचे. साक्षात लोकमान्य टिळक यांच्या समक्ष स्थापन झालेल्या या गणपतीने सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक सर्वच क्षेत्रांत अग्रक्रम मिळविला आहे. पुण्यात गेलं की, श्रीमंत दगडू शेट हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यात माझ्या प्रमाणेच अनेकांना धन्यता वाटते.
स्थापना
या गणपतीची स्थापना कशी झाली, यामागे एक दुःख:द घटना आहे. त्याकाळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई नावाचे एक सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते. श्रीमंत व सत्यशील गृहस्थ होते. पुण्यातील बुधवार पेठेतील दत्त मंदिर येथे ते आपल्या पत्नी व मुलासह राहत होते. त्याकाळी पुण्यामध्ये आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये श्रीमंत दगडू शेठ हलवाई यांच्या मुलाचे देहावसान झाले. त्या घटनेने ते स्वतः व त्यांच्या पत्नी सौ. लक्ष्मीबाई हे दोघेही दुःखी झाले. दरम्यानच्या काळात त्यांचे गुरू श्री. माधवनाथ महाराजांनी त्यांचे सांत्वन केले. त्यांना धीर देत सांगितले की, “आपण काही काळजी करू नका, आपण एक दत्ताची आणि एक गणपतीची मूर्ती तयार करा. त्यांची रोज पूजा करा. ही दोन दैवते आपल्या मुलाप्रमाणे सांभाळा. भविष्यात जसे आपले अपत्य आपल्या माता-पित्यांचे नाव उज्ज्वल करते. त्याप्रमाणे ही दोन दैवते तुमचे नाव उज्ज्वल करतील.”
महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शेटजींनी दत्ताची एक संगमरवरी मूर्ती व गणपतीची मातीची मूर्ती बनवून घेतली. या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली होती आणि त्यावेळी परिसरातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई, बाबुराव गोडसे, भाऊसाहेब रंगारी, श्री. मोरप्पाशेठ गाडवे उर्फ काका हलवाई, नारायणराव बाजेवाले उर्फ जाधव, नारायणराव भुजबळ, रामाराव बुटलेर, गणपतराव विठूजी शिंदे, सरदार परांजपे, शिवरामपंत परांजपे, गोपाळराव रायकर, नारायणराव दरोडे यांसह सर्व थरांतील लोकांनी या समारंभाला हजेरी लावली होती.
लोकमान्य टिळकांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा केलेली गणपतीची ही पहिली मूर्ती. सध्या शुक्रवार पेठेतील अकरा मारूती मंदिरात ठेवलेली आहे. तिची नित्य नियमाने पूजा चालू असते. आपल्याला आज खरं वाटत नाही. परंतु त्याकाळी ही मूर्ती बनविण्याचा खर्च सुमारे ११२५/- इतका आला होता.
उत्सवाची परंपरा
सन १८९४ साली लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. सन १८९६ साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मूर्ती तयार करण्यात आली. तिचा उत्सव होऊ लागला. दरम्यानच्या काळात श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचे निधन झाले. परंतु त्यांनी सुरू केलेली गणेशोत्सवाची परंपरा त्या परिसरातील नागरिकांनी व तत्कालीन कार्यकर्त्यांनी पुढे सुरू ठेवली. त्याकाळी हा गणपती बाहुलीच्या हौदाचा सार्वजनिक गणपती म्हणून ओळखला जात होता. या उत्सवाचे व्यवस्थापन सुवर्णयुग तरुण मंडळ करीत होते. सध्या ही मूर्ती आपल्या कोंढवा येथील बाबुराव गोडसे पिताश्री वृद्धाश्रमातील मंदिरात आहे.
पोटांत सिद्ध श्रीयंत्र!
सन १८९६ साली बनवलेल्या मूर्तीची अवस्था थोडी जीर्ण झाली होती. त्यामुळे सन १९६७ साली आपल्या दगडूशेठ हलवाई गणपतीच्या अमृत महोत्सवानिमित्त सुवर्णयुग तरुण मंडळाच्या प्रताप गोडसे आदींनी गणपतीची नवीन मूर्तीं बनविण्याचा संकल्प केला. त्यासाठी कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार श्री. शिल्पी यांना बोलावले. त्यांच्याकडून लहान मातीची मूर्ती नमुना म्हणून करून घेतली. बाळासाहेब परांजपे यांनी कार्यकर्त्यांना ती मूर्ती प्रोजेक्टर वरून मोठ्या पडद्यावर दाखविली व सर्वानुमते ती आधीच्या मूर्तीसारखी असल्याची खात्री पटल्यानंतर मोठ्या मूर्तींचे काम प्रत्यक्षात सुरू झाले.
पूर्ण मूर्ती तयार झाल्यानंतर श्री शिल्पी यांनी त्यावेळी जे ग्रहण झाले त्या दिवशी संगम घाटावर ग्रहण संपेपर्यंत देवाची आराधना केली. गणेश यंत्राची पूजा केली. त्यानंतर ज्या ठिकाणी मातीची मूर्ती तयार केली होती. त्याचठिकाणी येऊन विधीवत धार्मिक गणेश याग केला. त्यानंतर ते सिद्ध श्रीयंत्र मंगलमूर्तीच्या पोटामध्ये सर्वांसमक्ष ठेवले. शिल्पी यांनी जमलेल्या लोकांना या मंगलमूर्तीची तुम्ही सर्वांनी दररोज नित्य नियमाने पूजा करा. त्याचे शेवटपर्यंत पावित्र्य राखा. या गणपतीची ख्याती जगभर पसरेल असे सांगितले. शिल्पी यांचे हे बोल किती खरे ठरले, ते २०२१ सालात आपण प्रत्यक्ष पाहतोच आहोत. १९८४ मधील गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरामध्ये गणपतीची स्थापना झाली.
सोन्याचे कान
सुखरूप बरे झाल्यानंतर अमिताभ आणि जया बच्चन या दाम्पत्याने सोन्याचे कान अर्पण केले होते. पूर्वीचे मंदिर अपुरे पडू लागल्यानंतर २००२ मध्ये सध्याचे भव्य मंदिर उभारण्यात आले. बैठ्या मूर्तीचे चारही हात सुटे असून डाव्या हातामध्ये मोदक आहे, तर उजवा हात वरद म्हणजे आशीर्वाद देणारा आहे. अन्य दोन हातांमध्ये कमळ आणि डोक्यावर मुकूट आहे. मूर्तीच्या सोंडेवरील नक्षीकाम हाही उत्कृष्ट कलाकारीचा नमुना आहे. या मूर्तीचे डोळे हे महत्त्वाचे वैशिष्ट्य.
कोठूनही पाहिले तरी गणपती आपल्याकडेच पाहात आहे, याची प्रचिती दर्शन घेणाऱ्या भाविकांना येते. १९५२ साली दगडू शेठ हलवाई गणपती मंदिर-उत्सवाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी तात्यासाहेब आणि त्यांच्या मित्रमंडळींवर येऊन पडली. तात्यासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्याचे सहकारी मामासाहेब रासणे, अॅड. श्री. शंकरराव सूर्यवंशी आणि श्री. के. डी. रासणे या मंडळींनी हा उत्सव अत्यंत चोखपणे पार पाडला. आणि त्यानंतर या मंडळाने कधी मागे वळून पाहिलेच नाही! भक्तांनी आणि दानशूर दात्यांनी मंदिराच्या फंडासाठी उदार हस्ते देणग्या द्यायला सुरुवात केल्यावर तात्यासाहेब आणि त्यांचे मित्र यांना वाटू लागले की या पैशांतून आपल्याच बांधवांची सेवा करण्याहून अधिक मोठी ईश्वर-सेवा काय असू शकणार?
लवकरच या ध्येयवेड्या तरुण कार्यकर्त्यांनी उत्सवाच्या कार्याची व्याप्ती पारंपरिक पूजा-अर्चेच्या पलिकडे नेऊन सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाच्या क्षेत्रात पाऊल टाकले. मंदिरातले धार्मिक विधी थाटामाटाने साजरे करत असतानाच या तरुणांनी आपल्या राज्याच्या सामाजिक व राजकीय प्रश्नांकडे लक्ष वळवले. श्रीमंत दगडू शेठ हलवाई गणपती ट्रस्ट्च्या अखत्यारीत त्यांनी कितीतरी सामाजिक कार्यांचा प्रारंभ केला.
वंचित मुलांना शैक्षणिक आणि आर्थिक मदत, छोटे उद्योगधंदे करू इच्छिणाऱ्यांना किंवा फेरीवाल्यांना सुवर्णयुग सहकारी बँकेमार्फत आर्थिक सहाय्य, वृद्धाश्रम, वीटभट्टी-कामगारांचे पुनर्वसन ही नमुन्या दाखल काही उदाहरणे. आज श्रीगणेशांच्या आशीर्वादाने ’श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट’ हा एक आघाडीची संस्था म्हणून समृद्ध झाला आहे. मानवजातीची सेवा हीच परमेश्वराची सेवा या भावनेने काम करणाऱ्या या ट्रस्ट ने स्वत:ची डिग्निटी निर्माण केली आहे यात संशय नाही.
संपर्क
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट
२५०, गणपती भवन, शिवाजी रोड,बुधवार पेठ,पुणे -४११००२
फोन – ०२०-२४४७९२२२ /०२०- २४४६११८५ मोबा. ८२४०९०५७७६
www.dagdushethganpati.com
(छायाचित्रं सौजन्य विकिपीडिया)