गणेशोत्सव विशेष
– तुज नमो –
मुंबईचा सिद्धिविनायक
मुंबईतील सर्वात भक्तप्रिय गणेश मंदिर म्हणजे प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर. श्रीगणेशाचे सर्वात लोकप्रिय रूप म्हणजे सिद्धिविनायक! ज्या गणेशाची सोंड उजवीकडे झुकलेली किंवा वळालेली असते त्या गणेशाला सिद्धिविनायक असे म्हणतात. सिद्धिविनायक आपल्या भक्तांच्या मनोकामना त्वरित पूर्ण करतात. असं म्हणतात की, सिद्धिविनायक जसा लवकर प्रसन्न होतो तसाच तो लवकर रागावतो सुद्धा. सिद्धिविनायकचे नियम अतिशय कडक असतात!
अनोखे रूप
सिद्धिविनायकचे दुसरे वैशिष्ट्ये म्हणजे या गणेशाला चार हात आहेत. वरच्या उजव्या हातात कमळ, डाव्या हातात अंकुश. खालच्या उजव्या हातात मोत्यांची माळ तर डाव्या हातात मोदक आहे. धन, ऐश्वर्य, सफलता आणि सर्व मनोकामना पूर्ण करणार्या श्री गणेशाच्या पत्नी ‘रिद्धी’ आणि ‘सिद्धी’ त्याच्या दोन्ही बाजूंना उभ्या आहेत. या सिद्धिविनायकाचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे त्याच्या कपाळावर त्याचा पिता भगवान शंकरा प्रमाणे तिसरा नेत्र आणि गळ्यात सर्प देखील आहे. एका अखंड काळ्या शिळेपासून निर्मिलेली सिद्धिविनायकाची ही मनमोहक मूर्ती अडीच फूट उंच आणि दोन फूट रुंद आहे.
मुंबईतील प्रभादेवी परिसरांत सिद्धिविनायक मंदिर आहे. खरं तर सुप्रसिद्ध अष्ट विनायक मंदिरांत समावेश नसूनही हे मंदिर देशभर प्रसिद्ध आहे.एवढच नाही तर देशांतील सर्वाधिक श्रीमंत देवास्थानांत श्रीसिद्धिविनायक मंदिर देवस्थानाचा समावेश होतो.
इतिहास
सिद्धिविनायक मंदिराची निर्मिती इ. स. १६९२ मध्ये झाली असे म्हणतात. सरकारी नोंदी नुसार मात्र १९ नोव्हेंबर १८०१ या दिवशी हे मंदिर तयार झाले आहे. याच जागेवर विठू आणि देवुबाई पाटील यांनी बांधलेले सिद्धिविनायकाचे पहिले मंदिर अर्थातच खुप लहान होते. परंतु जस जशी या मंदिराची ख्याती वाढू लागली तशी भाविक भक्तांची दर्शनासाठी गर्दी वाढू लागली. त्यामुळे गेल्या दोन तीन दशकांत अनेक वेळा या मंदिराचे पुर्निर्माण करण्यात आले आहे.
१९९१ साली महाराष्ट्र सरकारने सिद्धिविनायक मंदिरासाठी २० हजार वर्गफूट जागा उपलब्ध करून दिली. याच जागेवर सध्या मंदिराची पाच मजली भव्य देखणी इमारत उभी राहिली आहे. या ठिकाणी प्रवचन हॉल, गणेश संग्रहालय, गणेश विद्यापीठ तसेच दुसर्या मजल्यावर मोफत ओषधोपचार करणारे हॉस्पिटल आहे. याच मजल्यावर सिद्धिविनायकाला रोजचा नैवेद्य तयार करण्यासाठी किचन असून किचन मध्ये तयार केलेला नैवेद्य येथील एका स्पेशल लिफ्टने थेट गाभार्यात पोहचविला जातो. श्रीगणेशा साठी तयार केलेले मोदक, लाडू व इतर नैवेद्य याच लिफ्टने देवा पर्यंत आणतात.
सोनेरी गाभारा
सिद्धिविनायक मंदिरातील गाभारा अशा प्रकारे बनविला आहे की सभा मंडपातील जास्तीत जास्त भाविकांना श्रींचे दर्शन मिळावे. पहिल्या मजल्या वरील गॅलरींमधून देखील भाविकांना श्रींचे दर्शन घेता येते. अष्टकोनी आकाराचे हे गर्भगृह १० फूट रुंद आणि १३ फूट उंच आहे. गाभार्यातील चबुतर्यावर सुवर्ण शिखराच्या चांदीच्या मंडपात श्री सिद्धिविनायक स्थानापन्न झालेले आहेत. गाभार्यात प्रवेश करण्यासाठी तीन लाकडी दरवाजे आहेत. यांवर अष्टविनायक, अष्ट लक्ष्मी आणि दशावरातातील प्रतिमा कोरलेल्या आहेत.
सिद्धिविनायक मंदिरांत दररोज सरसरी २५,००० भाविक नित्य दर्शनाला येतात. मंगळवारी मात्र मंदिरापासून सुमारे २ किमी पर्यंत भाविकांची रांग लगते. मात्र ४ ते ५ तासांत भाविकाला श्रींचे दर्शन घडते. दरवर्षी येथे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा १० सप्टेम्बर ते १९ सप्टेंबर २०२१ या कालावधीत कोरोना संदर्भात महाराष्ट्र शासन,मुंबई महानगर पालिका आणि पोलिस आयुक्त यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करीत भाविकांना श्री सिद्धिविनायकाचे ऑनलाईन दर्शन घेता येईल असे श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे चेअरमन श्री आदेश बांदेकर यांनी कळविले आहे.
अन्य वैशिष्ट्ये
सिद्धिविनायक मंदिर हे देशातील सर्वाधिक श्रीमंत संस्थानापैकी एक आहे.सर्व सामान्य भाविकांप्रमाणे सर्व जाती धर्माचे धनाढ्य उद्योजक,लोकप्रिय नेते, सिनेकलावंत या मंदिरात श्रींच्या दर्शनाला येतात. दरवर्षी या मंदिराला १०० ते १५० कोटी रूपये देणगीच्या स्वरुपांत मिळतात.
सिद्धिविनायक मंदिराची स्थापना १८०१ साली विठू आणि देवुबाई पाटील यांनी केली आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांना या मंदिरांत प्रवेश दिला जातो.
सिद्धिविनायक मंदिरातील पहिल्या मजल्यावर पुजार्यांच्या निवासाची व्यवस्था आहे.
भारतरत्न लता मंगेशकर, सचिन तेंदुलकर , महानायक अमिताभ बच्चन, उद्योगपति मुकेश अंबानी यांच्या सारख्या प्रसिद्ध व्यक्ती सिद्धिविनायकाच्या दर्शनाला नियमितपणे येतात.
मंदिराजवळ पूजा सामग्री,तुलशीमाला,फुलं,नारळं,मिष्ठान्न आदिची अनेक दुकानं आहेत. या गल्लीला ‘फुल गल्ली’ म्हणतात.
सुप्रसिद्ध सिने-टीव्ही कलाकार श्री आदेश बांदेकर श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्ट चे चेअरमन आहेत.
दर्शन वेळा
बुधवार ते सोमवार
काकड़ आरती पहाटे ५.३० ते ६.००
श्री दर्शन -सकाळी ६.०० ते १२.१५
नैवेद्य- १२.१५ ते १२.३०
श्री दर्शन – १२.३० ते ७.२०
सायं आरती सायं ७.३० ते ८.००
शेजारती रात्री ९.५०
दर्शन वेळा मंगळवार
श्री दर्शन पहाटे ३.१५ ते ४.४५
काकड आरती ५.०० ते ५.३०
श्रीदर्शन ५.३० ते १२.१५
नैवेद्य १२.१५ ते ८.४५
रात्री आरती ९.३० ते १०.००
शेजारती १२.३०
त्याचप्रमाणे विनयकी चतुर्थी, संकष्ट चतुर्थी, माघी श्री गणेश जयंती ,भाद्रपद श्री गणेश चतुर्थी यांच्या वेळा वेबसाइट वर उपलब्ध आहेत.
संपर्क
सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट
एस.के.बोले मार्ग, प्रभादेवी, मुंबई- ४०००२८
फोन – ०२२ २४३ ७३६२६ फैक्स – ०२२ २४२२ १५५८
email: info@siddhivinayak.org
सिद्धिविनायक मंदिर ऑनलाईन दर्शनासाठी संपर्क
www.siddhivinayak.org
(छायाचित्रे सौजन्य विकिपीडिया)